जायकवाडी : पिंपळवाडी येथे मध्यवस्तीत असलेल्या स्वस्त धान्य दुकानाला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत दुकानातील चार रॉकेल टाक्यांचा स्फोट झाला असून औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. पिंपळवाडी (पिराची) येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक २०३ चे चालक रामगोपाल साबू यांनी सकाळी रॉकेलचे वाटप करण्यासाठी दुकान उघडले. यावेळी दोनशे रेशनकार्डधारक दुकानासमोर रांग लावून उभे असताना गर्दीत अचानकपणे रॉकेलच्या टाकीला आग लागली. टाक्यांचा स्फोट सुरू झाला. भीतीने उपस्थित नागरिक तात्काळ दुकानापासून बाजूला गेले. यावेळी नागरिकांनी या दुकानाच्या आजूबाजूला असलेल्या घरातील व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर काढले व पैठण औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलास याची माहिती दिली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी कैलास पुंड, उपसरपंच बिलाल शेख, शंकरराव वाघमोडे, मुनाफ शेख, विलास दहीहंडे, बाळू चाबूकस्वार, मुरलीधर चाबूकस्वार, दादा गलांडे, इनायतखाँ पठाण, सरपंच भाऊ लबडे, सत्तारभाई शेख, पो.कॉ. अभिजित सोनवणे आदींनी मोलाचे सहकार्य केले. (वार्ताहर) अग्निशमन दलामुळे टळली मोठी हानी अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत दुकानातील रॉकेलच्या टाक्या, बारदाना जळून रामगोपाल साबू यांचे अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. तहसीलदार संजय पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधितांना रॉकेल वितरणाबाबत सूचना दिल्या. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसून या घटनेने मात्र पिंपळवाडीकरांचा भीतीने थरकाप उडाला होता.
रेशन दुकानाच्या आगीत रॉकेल टाक्यांचा स्फोट
By admin | Updated: May 28, 2014 01:13 IST