कळंब : शहरापासून जवळच शेतात घर करुन राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या घरात रविवारी दुपारी घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा १९ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. दिवसाढळ्या घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहरापासुन काही अंतरावर हावरगाव रोडवर विजय करंजकर यांची शेतजमीन आहे. याठिकाणी करंजकर हे शेतातच घर करुन वास्तव्य करतात. रविवारी ते आपल्या शेतात काम करत असताना घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश मिळविला. यावेळी चोरट्यांनी अंदाजे १७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी व रोख रक्कम असा १९ हजार रुपयांचा लंपास केला. याप्रकरणी विजय करंजकर यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस जमादार एस. डी. पवार करीत आहेत.
कळंब शहरात दिवसा घरफोडी
By admin | Updated: April 3, 2017 22:39 IST