लोहारा : शहरातील भरचौकात असलेल्या सराफा दुकानाच्या शटरचे कुलूप उचकटून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख, दहा हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, भरचौकात जबरी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे़ याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील मध्यवर्ती असलेल्या शिवाजी चौकात संभाजी पोतदार यांचे हे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे़ नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी कामकाज झाल्यानंतर संभाजी पोतदार, बालाजी पोतदार व कारागीर हे दुकानाला कुलूप लावून घराकडे गेले होते़ मंगळवारी सकाळी दुकान उघडण्यास आल्यानंतर दुकानाच्या शटरचे कुलूप तुटल्याचे दिसून आले़ त्यांनी तत्काळ लोहारा पोलिसांना घटनेची माहिती दिली़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला़ शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी दुकानातील समोरील व बाजूच्या काऊंटरमधील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले़ तिजोरीचे लॉक चोरट्यांनी तोडले़ मात्र, ती उघडली नाही़ चोरट्यांनी आतील चांदीच्या मूर्ती, ताट, वाटी, समई, चैन, जोडवे, तांबे, आरत्या असा ४ किलोंचा मुद्देमाल तर सोन्याच्या मोरण्या, दागिने असा २७ हजाराचा मुद्देमाल तर तीन हजार रूपयांचा सीसीटीव्ही फुटेजबॉक्स असा मुद्देमाल २ लाख १० हजार रूपये लंपास केल्याचे दिसून आले़ या प्रकरणी संतोष पोतदार यांनी लोहारा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश कलासागर, स्थागुशाचे पोनि माधव गुंडीले, पोनि संतोष गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली़ भर चौकातील दुकान फोडल्याने परिसरातील व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)