औरंगाबाद : प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढताच सेतू सुविधा केंद्रात दलालही सक्रिय झाले आहेत. कमी वेळेत आणि विनात्रास प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देऊन हे दलाल विद्यार्थी आणि पालकांकडून वाटेल तसे पैसे उकळत आहेत. अगदी सेतू सुविधा केंद्राच्या आतही दलालांचा वावर बिनदिक्कतपणे सुरू आहे.दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाल्यामुळे सेतू सुविधा केंद्रात सध्या विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. पुढील प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळविण्याकरिता विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने येथे येत आहेत. परिणामी, सेतू केंद्रातील खिडक्यांवर रांगा लागलेल्या दिसत आहेत. याचाच फायदा घेत सध्या येथे मोठ्या प्रमाणावर दलाल सक्रिय झाले आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांना गाठून कमी वेळेत प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडे जास्तीचे पैसे उकळले जात आहेत. विशेष म्हणजे सेतूतील काही कर्मचाऱ्यांचीही त्यांना साथ मिळत आहे. रहिवासी, उत्पन्न, वय अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, महिला आरक्षण आदी प्रमाणपत्रांना वाढती मागणी आहे. प्राप्त अर्जांची संख्या वाढल्यामुळे ते मिळण्यासाठी उशीर होत आहे. त्याचाच गैरफायदा घेत हे दलाल विद्यार्थी व पालकांकडून जास्तीचे पैसे उकळत आहेत. सेतू सुविधा केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असूनही प्रशासनाचे याकडे फारसे गांभीर्याने लक्ष नाही. सेतू सुविधा केंद्राबाहेरील हे दलाल रहिवासी, उत्पन्न तसेच वय, अधिवास या प्रमाणपत्रांसाठी दोनशे ते तीनशे रुपये घेत आहेत. प्रत्यक्षात या प्रमाणपत्रांसाठी अवघे ६० रुपयांचे शुल्क आकारले जाते. याशिवाय काही जण अर्ज भरून देण्यासाठी म्हणून लोकांकडून पैसे उकळत आहेत. विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी मांडले दुकानदलालांप्रमाणेच विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी येथे दुकान थाटले आहे. शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हाभरात अनेक लोकांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांची कागदपत्रे मोफत साक्षांकित करून द्यावीत, असे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक विशेष कार्यकारी अधिकारी सध्या सेतू सुविधा केंद्रासमोर दुकान मांडून बसले आहेत. एकेक प्रत साक्षांकित करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ते दहा-दहा रुपये घेत आहेत. सेतूतील दलालांना आवर घालण्यासाठी प्रशासनाने सिटीचौक पोलिसांना पत्र दिले असल्याचे सेतू समितीच्या समन्वयक उपजिल्हाधिकारी सरिता सूत्रावे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, सेतूतील दलालांना अटकाव करण्यासाठी प्रशासनाने काही उपाय योजले आहेत. सेतूत खाजगी महिला सुरक्षारक्षकांना नेमण्यात आले आहे. दोन मार्गदर्शकांचीही नियुक्ती केली आहे. अर्जदारांनी कुठे अर्ज करावा, कसा करावा याची माहिती ते लोकांना देत आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रतीही स्वीकारल्या जात आहेत. नागरिकांनी दलालांकडे न जाता सेतूतच आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहनही सूत्रावे यांनी केले.
‘सेतू’मध्ये दलाल सक्रिय
By admin | Updated: June 19, 2014 00:53 IST