अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाईजनसंघांच्या स्थापनेपासून ते भारतीय जनता पक्षाच्या निर्मितीत योगदान असणाऱ्या भाजपच्या कर्मभूमीत अनेक निष्ठावंत आजही कायम आहेत. मात्र, सातत्याने पक्षात नव्याने दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे निष्ठावंतांची कायम गोची सुरूच आहे. महाराष्ट्रात आणिवाणीनंतर जनसंघाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोठी फौज अंबाजोगाईत व केजमध्ये निर्माण झाली. या जनसंघाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाली. अंबाजोगाईच्या मातीतून कै. प्रमोद महाजन, कै. गोपीनाथ मुंडे, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, अशी कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली. ही सर्व नेतृत्व राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचली. या सर्वांना घडविण्याचे काम अंबाजोगाईत प्राचार्य राजाभाऊ धाट, मा.मा. क्षीरसागर, राजाभाऊ चौसाळकर, यांच्यासह मान्यवरांनी केली. आज भाजपचा वटवृक्ष झाल्यानंतर पक्षाच्या निर्मितीपासून खस्ता खाणारे हे लोक कुठे आहेत? याचा विसर भाजपला पडला आहे. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून प्रा. सतीश पत्की, प्रा. अशोक लोमटे, अनिल बायस असे नेतृत्व तयार झाले. हे निष्ठावंत आजही पक्षात अडगळीला पडले आहेत. तर भाजपामध्ये प्रारंभीपासून कार्यकर्त्यांची भूमिका निम्भावणारे डॉ. अमृतराव देशपांडे, भारत पसारकर, राम घाडगे (केज), अशी अनेकांची नावे सांगता येतील. या सर्वांनी पक्षाच्या विस्तारासाठी कठोर परिश्रम व मेहनत घेतली. मात्र, पक्ष सत्तेत आल्यानंतर सत्तेची फळे चाखण्यासाठी मोठ्या प्रमाणात आयाराम - गयाराम यांची गर्दी वाढली. अन् परिणामी निष्ठावंतांची आजही कायम गोची सुरूच आहे.अंबाजोगाई व केज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातून भाजपमधून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. गेल्या पाच वर्षात दत्तात्रय पाटील, राजेश कराड, सुनिल लोमटे, अविनाश लोमटे, हारूण इनामदार, अशा कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करीत ज्यांना भाजपचा इतिहासही माहित नाही. असे अनेक कार्यकर्ते पक्षात येऊन सत्तेची फळे चाखत आहेत. मात्र, पक्षासाठी परिश्रम घेतलेले निष्ठावंत मात्र आजही कायम अडगळीलाच पडलेले आहेत. ज्या कर्मभूमीतून राष्ट्रीय पातळीवरचे नेतृत्व साध्य करण्याची किमया या मतदार संघात झाली. त्याच मतदार संघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपेक्षा कायम आहे.
केज मतदारसंघात भाजपातील निष्ठावंतांची कायम गोची
By admin | Updated: September 8, 2014 00:55 IST