लातूर : मनपात अर्धशतकी आकडा गाठलेल्या काँग्रेसला आणखी एक झटका बसला. बीबीहाजरा खय्युमखान पठाण यांचे दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याच्या कारणावरुन नगरसेविका पद रद्द झाले आहे. लातूर मनपात नगरसेवक डॉ. विजयकुमार अजनीकर यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसचे संख्याबळ ५० झाले होते. परंतु काँग्रेसचा हा आनंद फार काळ टिकला नाही. शाहीन युन्नूस सलीम काझी या पराभूत प्रतिस्पर्धी उमेदवाराने वरिष्ठ जिल्हा दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. २६ / ४/ २०१२ ला दाखल झालेल्या या अर्जात नगरसेविका बीबीहाजरा खय्युमखान पठाण यांना दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याने त्यांचे सदस्त्व रद्द करण्याची मागणी केली होती. यावर वेळोवेळी सुनावण्या झाल्या. यात फिर्यादीची तक्रार ग्राह्य धरुन न्या. एस. एम. यल्लाटी यांनी नगरसेविका पठाण यांचे सदस्यत्व रद्दबातल केले. फिर्यादीच्या वतीने अॅड. धनंजय पाटील यांनी बाजू मांडली. तर नगरसेविका पठाण यांच्या बाजूने के. एस. राजुरे यांनी बाजू मांडली तर प्रशासनाचे वतीने एम. पी. राजुरे यांनी म्हणणे मांडले. (प्रतिनिधी)नगरसेविका बीबीहाजरा खय्युमखान पठाण या पद रद्द झालेल्या तिसऱ्या नगरसेविका ठरल्या. यापूर्वी प्रभाग क्रमांक ३१ चे नगरसेविका रजिया शेख यांना जातीच्या प्रमाणपत्रावरुन न्यायालयानेच अपात्र ठरविले होते. त्यानंतर प्रभाग १३ चे नगरसेवक आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने सदस्यत्व रद्द झाले. आता तिसऱ्या नगरसेवकाचे दोनपेक्षा जास्त अपत्याच्या कारणावरुन सदस्यत्व रद्द झाले आहे.
बीबीहाजरा खय्युमखान पठाण यांचे नगरसेवक पद रद्द
By admin | Updated: November 20, 2014 00:47 IST