परभणी : येथील पंचायत समितीचे माजी गटविकास अधिकारी एस़ एऩ गोपाळ यांना रोहयोंतर्गत विहिरींना नियमबाह्य मंजुरी दिल्याचे प्रकरण चांगलेच भोवले असून, याच प्रकरणात त्यांना विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी निलंबित करून दणका दिला आहे़ ‘लोकमत’ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले होते़ परभणी पंचायत समितीचे माजी गटविकास अधिकारी एस़ एन गोपाळ यांच्याकडे सेलू पंचायत समितीचा ९ ते ३० जून २०१५ आणि १९ डिसेंबर २०१५ ते २० जानेवारी २०१६ असा पदभार होता़ या काळात गोपाळ यांनी रोहयोअंतर्गत विहिरींना नियमबाह्यरित्या मंजुरी दिल्याचे प्रकरण उघड झाले होते़ या प्रकरणाचा ‘लोकमत’ने पाठपुरावा केला़ यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या़ त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुमरे यांनी दिले होते़ त्यानुसार ११ व १२ मार्च रोजी सेलू पंचायत समितीमध्ये रोहयोच्या कामांची तपासणी करण्यात आली़ तपासणी अंती रोहयो विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी़ एस़ कच्छवे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम़ व्ही़ करडखेलकर यांच्या तपासणी पथकाने डुमरे यांना अहवाल दिला़ त्यामध्ये १ हजार २६ विहिरींना गोपाळ यांनी नियमबाह्यरित्या मंजुरी दिल्याचे नमूद करण्यात आले होते़ यासंदर्भातील वृत्त ११ व १२ मार्च असे सलग दोन दिवस ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते़ हा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता़ तसेच गोपाळ यांना निलंबित करण्याची शिफारसही मुख्य कार्यकारी अधिकारी डुमरे यांनी केली होती़ या प्रस्तावानुसार गोपाळ यांना निलंबित केल्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी सोमवारी काढले आहेत़ मंगळवारी हे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले़ (जिल्हा प्रतिनिधी)
गोपाळ यांना रोहयोतील अनियमितता भोवली
By admin | Updated: March 23, 2016 00:24 IST