हिंगोली : महाराष्ट्र शासनाने आंतराष्ट्रीय विकास संस्थांशी केलेल्या कृषी प्रत प्रकल्प कराराची परिणिती म्हणून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेअंतर्गत सन २०१३- १४ मध्ये जिल्हभरातील २९ गावांना शिवकालीन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. पाणीटंचाइ जिल्ह्याच्या पाचवीलाच पूजलेली आहे. कुठेही साठवण होत नसल्याने पावसाचे पाणी हे थेट सागराला जावून मिळत आहे. परिणामी, जिल्ह्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येत आहे. शिवकालीन योजनेत टंचाईग्रस्त गावांचे सर्वेक्षण भूजल विकास यंत्रणेद्वारे करण्यात येते. नंतर भूशास्त्रीय व भूजलविषयक नकाशा तयार केला जातो. तसेच भूजल साठ्याचा अंदाज घेऊन त्या गावचा सध्याचा भुजल वापर आणि पुढील वापरासाठी उपलब्धतेसंदर्भात माहिती जमा केली जाते. यातून निकष पूर्ण होत असल्याचे सदर गाव शिवकालीन योजनेत निवडले जाते. या योजनेचे नामकरण करुन आता राष्ट्रीय पेयजल योजना असे नाव देण्यात आले. २०१३- १४ मध्ये यात एकूण २९ गावांत ७२ उपाययोजना केल्या. यामध्ये कृती आराखड्यानुसार ४ गावांत विहीर पुनर्भरण, ६ गावांत सिमेंट नालाबांध केले. तसेच ८ ठिकाणी पाझर व विहीरतील गाळ काढला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात ज्या गावात हातपंपाना पाणीसाठा उपलब्ध आहे. अशा एकूण १०० गावांत सौरऊर्जेवर आधारित पंप बसविले आहेत. यावर्षीसुध्दा ज्या गावातील हातपंपाना पाणीसाठा उपलब्ध असेल त्या गावात सोलार पंप बसविण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. पेयजल योजनेअंतर्गत सन २०१३-१४ मार्च अखेर ८० लाख ९६ हजार रुपये खर्ची पडले आहेत. (प्रतिनिधी)
२९ गावांना ‘शिवकालीन’चा लाभ
By admin | Updated: November 15, 2014 23:54 IST