जालना : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदी शिवसेना-भारतीय जनता पक्षाचा सदस्य विराजमान होईल, असे स्पष्ट चित्र आहे. दरम्यान, अध्यक्षपदी अनिरुध्द खोतकर तर उपाध्यक्षपदी भाजपाचे भगवानसिंग तोडावत, शितल गव्हाड, लिलाबाई लोखंडे या तिघांपैकी एकाची वर्णी लागेल, असे संकेत आहेत. येथील जिल्हा परिषदेवर युतीचे निर्विवाद वर्चस्व आहे. याही निवडणुकीत ते वर्चस्व कायम राहील, असे स्पष्ट चित्र आहे. शिवसेनेचे १५, भाजपाचे १५ असे पक्षीय बलाबल असून एकूण ५ अपक्ष सदस्यांपैकी ३ सदस्य खुलेआमपणे शिवसेनेच्या पाठीशी आहेत. आणखी एक सदस्य आपल्या पाठीशी असल्याचा व संख्याबळ १९ पर्यंत पोहोचल्याचा दावा शिवसेनेद्वारे होत आहे. या संख्याबळा आधारेच शिवसेनेने अध्यक्षपदावर आपला भक्कम दावा ठोकला आहे. शिवसेनेकडून माजी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर हे पुन्हा अध्यक्षपदासाठी उत्सूक आहेत. त्यांचेच नाव शनिवारी सायंकाळपर्यंत आघाडीवर होते. जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे हेही अध्यक्षपदासाठी उत्सूक आहेत. परंतू त्यांचे नाव कितपत पुढे येईल, हे सांगणे कठीण आहे. माजीमंत्री अर्जुन खोतकर हे शिवसेना सदस्य अध्यक्षपदी विराजमान व्हावे यासाठी भक्कम मोर्चेबांधणी करत असून अनिरुध्द खोतकर यांच्या पारड्यातच ते वजन टाकतील, असा अंंदाज आहे. अध्यक्षपदाच्या स्पर्धेतील संभाजी उबाळे यांचे नाव केव्हाच मागे पडले. शिवसेनेने उबाळे यांना सभापतीपदाचा शब्द दिला असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी पुन्हा मोर्चेबांधणी केली जात असताना भाजपाच्या सदस्यांनीही अध्यक्षपदासाठी मोठा दावा ठोकला आहे. भाजपाकडून अर्धा डझन सदस्य अध्यक्षपदासाठी इच्छुक असून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे हे इच्छूक हट्ट धरु लागले आहेत. दानवे यांनी अध्यक्षपदासाठी हट्ट धरावा. शिवसेनेस राजी करावे. त्यासाठी आपले वजन खर्ची करावे, अशी अपेक्षा भाजप सदस्य व्यक्त करीत असून त्यामुळेच दानवे यांच्यासमोरही पेच उभा राहिला आहे. राजकीय तडजोडीतून अध्यक्षपद शिवसेनेकडून खेचून आणले तर इच्छुकांपैकी कोणास झुकते माप द्यावे, असा यक्ष प्रश्न दानवे यांच्यासमोर पडला असून त्यामुळे ते यातून कोणता मार्ग काढणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे. भाजपास अध्यक्षपद सोडल्यास उपाध्यक्षपदावरच शिवसेनेस समाधान मानावे लागेल. तडजोडीतून चार पैकी तीन सभापतीपदे खेचता येऊ शकतील. परंतू त्यासंदर्भातील तडजोडीविषयी मोठी अनिश्चितता आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी युतीत मोठी रस्सीखेच सुरु होती. रात्री उशिरापर्यंत कोणताही निर्णय झाला नाही. परंतू मध्यरात्री बैठकीतून यासंदर्भात शिक्कामोर्तब केले जाईल, असे चित्र होते. (जिल्हा प्रतिनिधी) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत जालन्यात ठाण मांडून होते. माजी मंत्री खोतकर, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्याबरोबर ते एका कार्यक्रमातही सहभागी होते. परंतु, निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. रात्री उशिरापर्यंत बैठक होईल व त्यातून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दानवे, खोतकर व अंबेकर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. येथील जिल्हा परिषदेवर युतीचीच सत्ता अबाधित राहिल, असा विश्वास दानवे व खोतकर या दोघांनी व्यक्त केला. युतीत कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. बिनशर्त युती होईल व सत्ता ताब्यात राहील. सदस्य या दोन्ही पदी विराजमान होतील, असा दावाही या दोघांनी केला. शिवसेनेने नेहमीच अध्यक्षपद स्वत:कडे कायम राखले असून यावेळी युतीचा धर्म म्हणून शिवसेना आपल्या मित्रपक्षास म्हणजे भाजपास अध्यक्षपद सोडवून मनाचा मोठेपणा दाखवेल का, असा प्रश्न उभा राहिला आहे.