औरंगाबाद : ‘कुटुंब लहान, सुख महान’ या जाहिरातीद्वारे लहान कुटुंबाचे महत्त्व शासनाकडून सांगितले जाते. दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तीस शासनाने पंचायत समिती, जिल्हा परिषद, मनपा सदस्यत्वासाठी अपात्र ठरविले आहे. एवढेच नव्हे तर नोकरीसाठीही लहान कुटुंबाला प्राधान्य देण्यात आले आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अत्यंत प्रभावी साधन आहे. देशात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत मिळालेले उद्दिष्ट गाठण्यात औरंगाबाद आरोग्य विभाग यावर्षी अयशस्वी ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या औरंगाबाद उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. शासनाने औरंगाबाद उपसंचालक विभागाला ४६ हजार ३५० कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले होते. या उद्दिष्टपूर्तीसाठी विभागातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी ते प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ आणि अंगणवाडीसेविका यांनी प्रयत्न केले. औरंगाबाद जिल्ह्याला १२ हजार ७५० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्यातील अधिकार्यांना ११ हजार २१ शस्त्रक्रिया करता आल्या आहेत. जालना जिल्ह्याचे काम सर्वांत कमी झाले आहे. जालना जिल्ह्याला ११ हजार ३०० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी जिल्ह्यात ८ हजार ७०३ महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्या. केवळ ७७ टक्के उद्दिष्ट साध्य करता आल्याचे उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. परभणी जिल्ह्याला मिळालेल्या ९ हजार ६०० शस्त्रक्रियांच्या उद्दिष्टापैकी ७ हजार ९६५ शस्त्रक्रिया करण्यात यश आले. हिंगोली जिल्ह्याने १०४ टक्के काम केल्याचे समोर आले आहे. हिंगोलीला ७ हजार ६०० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट असताना तेथील डॉक्टरांनी केलेल्या जनजागृतीमुळे ७ हजार ९०४ शस्त्रक्रिया करता आल्या. औरंगाबाद महानगरपालिकेतील डॉक्टरांचे काम विभागात सर्वोत्तम राहिले आहे. मनपा आरोग्य विभागाला ५ हजार १०० शस्त्रक्रिया करण्याचे सांगण्यात आले होते. विभागाने ५ हजार ४६१ महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून लोकसंख्या नियंत्रणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.पुरुष नसबंदीसंदर्भात असलेले गैरसमज आजही कायम आहेत. औरंगाबाद विभागात १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत केवळ १५६ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली. यात सर्वाधिक ८९ शस्त्रक्रिया औरंगाबाद ग्रामीण भागात झाल्या.
औरंगाबाद विभाग झाला नापास
By admin | Updated: May 26, 2014 01:13 IST