औरंगाबाद : औरंगाबाद परिसरात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प, वाळूज महानगर, चिकलठाणा, शेंद्रा औद्योगिक वसाहती आहेत. या ठिकाणी चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे भविष्यात औरंगाबाद देशाचे औद्योगिक केंद्र बनेल, असे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट म्हणाले. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील देशांतर्गत एअर कार्गो टर्मिनलचे बुधवारी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘सीएमआयए’चे अध्यक्ष आशिष गर्दे, ‘सीआयआय’चे अध्यक्ष संदीप नागोरी, ऋ षीकुमार बागला, विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय, कार्गो सर्व्हिस सेंटरचे चीफ फायनान्शियल आॅफिसर हरीश शेट्टी, ‘सीआयएसएफ’चे असिस्टंट कमांडंट किशोरकुमार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्गो सेवेबरोबर या ठिकाणी कोल्ड स्टोअरेजची सुविधा मिळावी, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी उपमहाप्रबंधक शरद येवले, जेट एअरवेजचे स्वामीनाथन्, एअर इंडियाचे रमेश नंदे, ट्रुजेटचे किरण माने आदींची उपस्थिती होती. इंडिगो एअरवेज कंपनीकडून चिकलठाणा विमानतळावर पार्किंगसाठी विचारणा होत आहे. शिवाय इंडिगो एअरवेज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी विमानतळाची पाहणी केली होती. या कंपनीकडून दिल्ली अथवा मुंबई तसेच अन्य शहरांसाठी सेवा डिसेंबरपर्यंत सुरूकरण्याचा प्रयत्न केला जात आहे. पार्किंग सुविधा आणि नव्या विमानाच्या माध्यमातून औरंगाबादहून या कंपनीची विमानसेवा लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच फाईव्ह स्टार हॉटेल मालकांनी विमानतळावर सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे.
औरंगाबाद बनेल देशाचे औद्योगिक केंद्र
By admin | Updated: June 13, 2016 00:45 IST