:आरोपीविरुध्द फसवणुक व बलात्काराचा गुन्हा दाख
आरोपीविरुद्ध फसवणूक व बलात्काराचा गुन्हा दाखल
वाळूज महानगर : फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर बजाजनगर परिसरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या रोहन राजेंद्र खाजेकर (रा.रामनगर, औरंगाबाद) या आरोपीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १२) गुन्हा दाखल करण्यात आला.
बजाजनगर परिसरातील २५ वर्षीय तरुणी साडेचार वर्षापासून मुंबईतील भांडूप येथे लहान मुले सांभाळण्याचे काम करते. दोन वर्षांपूर्वी मुंबईत असताना पीडित तरुणीची आरोपी रोहनशी फेसबुकवरून ओळख झाली होती. जून २०१९ मध्ये रोहन हा मैत्रिणीला भेटण्यासाठी मुंबईत गेला होता. रोहनने तिला लग्नाची मागणी घातली. तरुणीने रोहनला तिच्या आई-वडिलाना भेटण्याचा सल्ला दिला. त्यांना भेटण्याचे वचन देऊन रोहन औरंगाबादला परत आला. यानंतर रोहनची आईदेखील तिच्याशी फोनवरून संपर्क साधत असे. डिसेंबर २०१९ मध्ये रोहनने तिला औरंगाबादला प्रोझोन मॉल येथे बोलावून लग्नाविषयी चर्चा केली. रोहनच्या आईने तिच्याशी संपर्क साधून पैसे जमा करण्यास सांगितले. लग्न होणार असल्यामुळे त्या तरुणीने सन २०१९ पासून रोहनच्या बँक खात्यावर प्रतिमहिना १० ते १२ हजार रुपये पाठविण्यास सुरुवात केली. डिसेंबर २०२० मध्ये त्या तरुणीच्या मावस काकाच्या निवासस्थानी पाहण्याचा कार्यक्रम झाला. १५ एप्रिल रोजी औरंगाबादला कोर्टात लग्न करण्याचा निर्णय झाला.
टिफीनच्या बहाण्याने केला अत्याचार
लग्न ठरल्यानंतर १९ मार्च २०२१ला रोहनने आपल्या नियोजित वधूशी संपर्क साधून मला तुझ्या हातचे जेवण करायचे आहे, असे म्हणून बजाजनगरात तिच्या घरी गेला. तरुणीची आई मंदिरात गेल्याची संधी साधून रोहनने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्यास विरोध केला. तिचा विरोध झुगारून त्याने तिच्याशी शारीरिक संबध प्रस्थापित केले. यानंतर त्याने तू शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने मी तुझ्याशी लग्न करणार नाही, असे म्हणून निघून गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून रोहन खाजेकर याच्याविरोधात तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव हे तपास करीत आहेत.
--------------------------