औरंगाबाद : भाजपाचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील उमेदवार अतुल सावे यांच्या पदयात्रेत गटातटाचा वाद उफळून आला. किरकोळ कारणावरून वाद उकरून काढीत भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष मनोज भारस्कर यांनी आपल्याच पक्षाच्या दोन वॉर्ड अध्यक्षांवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही घटना सावे यांच्या बजरंग चौकातील प्रचार कार्यालयासमोर घडली. या हल्ल्यात भाजपा आविष्कार कॉलनी वॉर्ड अध्यक्ष मयूर वंजारी व शुभश्री कॉलनी वॉर्ड अध्यक्ष अजित कासार हे दोघे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर भाजपाचे हे प्रचार कार्यालय तातडीने बंद करण्यात आले. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री अतुल सावे यांच्या प्रचारार्थ बजरंग चौकातून पदयात्रा काढण्यात आली होती. ही पदयात्रा सुरू असतानाच भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज भारस्कर यांना वॉर्ड अध्यक्ष मयूर वंजारी यांची लाथ लागली. त्यातून भारस्कर आणि वंजारी गटात वाद झाला. शिवीगाळ झाली; परंतु इतर कार्यकर्त्यांनी दोन्ही गटांची समजूत घालून तेथे हा वाद मिटविला. पदयात्रा संपल्यानंतर वंजारी व कासार हे दोघे बजरंग चौकातील सावे यांच्या प्रचार कार्यालयात आले. काही वेळात मनोज भारस्कर आपल्या साथीदारांसह तेथे पोहोचले. ‘तुम्ही जास्त माजलात’ असे म्हणत मनोज व त्यांच्या साथीदारांनी वंजारी व कासार या दोघांना कार्यालयातून बाहेर ओढले आणि बेदम मारहाण केली. मारहाण करता करता मनोज भारस्कर यांनी चाकू काढून वंजारी व कासार यांच्यावर सपासप वार केले. त्यानंतर भारस्कर तेथून पसार झाले. या प्रकारानंतर कार्यालयातील इतर कार्यकर्त्यांनी तातडीने या दोन्ही जखमींना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात आणले. घटनेची माहिती मिळताच फौजदार हरीश खटावकर रुग्णालयात पोहोचले आणि दोन्ही जखमींचे जबाब नोंदवून घेण्यात आले. त्या जबाबावरून सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
भाजयुमो जिल्हाध्यक्षाचा वॉर्ड अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: October 2, 2014 01:04 IST