औरंगाबाद : डाळिंब निर्यातीसाठी जिल्ह्यातील ३७१ बागायतदारांनी इच्छा दर्शविली आहे. निर्यातक्षम डाळिंब तयार करण्याची क्षमता असणाऱ्या उत्पादकांचे नाव वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे. निर्यातीच्या दराचा फायदा थेट उत्पादकाला मिळावा यासाठी कृषी पणन मंडळ निर्यातदार व उत्पादकांची भेट घडवून आणणार आहे. डाळिंबाची साल जाड असल्याने त्याचे आयुष्यमान इतर फळांच्या मानाने जास्त असते. या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे दूरवरच्या बाजारपेठेत पाठवणे शक्य होते. शीतगृहात शून्य अंश तापमान आणि ९० टक्के आर्द्रता ठेवली असता फळे चार महिन्यांपर्यंत उत्तम तऱ्हेने साठवून ठेवता येतात. मराठवाड्यात १००७५ हेक्टर क्षेत्रावर डाळिंब बागा आहेत. त्यातील औरंगाबाद जिल्ह्यात ४४०० हेक्टर क्षेत्रावर बागा उभ्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निर्यातीसाठी नाशिक येथील दलालांशी संपर्क करावालागतो. दलाली द्यावी लागत असल्याने कमी भाव मिळतो. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र कृषी पणन मंडळाने पुढाकार घेतला असून निर्यातक व डाळिंब उत्पादक यांची थेट भेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केलाआहे. विभागीय कार्यालयाचे उपसरव्यवस्थापक संतोष आळसे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील शेतकरी निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन करतात; पण निर्यातीसाठी नावनोंदणी करत नसल्याने निर्यात होत नाही. ज्यांनी नोंदणी केली, त्या शेतकऱ्यांच्या नावाने डाळिंब निर्यातीला पाठवावी लागतात. यासाठी सर्वप्रथम आम्ही उत्पादकांची नोंदणी सुरू केली. नावनोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना निर्यातक्षम डाळिंब कसे तयार करायचे याची इत्थंभूत माहिती देण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. यानंतर निर्यातदार व उत्पादकांची थेट भेट घडवून आणण्यात येणार आहे. जेणेकरून मधल्या दलालांची साखळी कमी होऊन उत्पादकांना चांगला भाव मिळेल.आंबा निर्यात सुविधा केंद्रात डाळिंबालाही परवानगी कृषी पणन मंडळाच्या वतीने जालन्यात केशर आंबा निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. मागील वर्षी या केंद्रातून १६ टन केशर निर्यातीसाठी पाठविण्यात आला होता. हंगामातच या केंद्राचा वापर करण्यात येतो. डाळिंब हे वर्षभर उपलब्ध असते. मराठवाड्यातील डाळिंबांची निर्यात वाढविण्यासाठी आता जालन्यातील आंबा निर्यात सुविधा केंद्राचा वापर करण्यात येणार आहे. या केंद्रात यांत्रिक प्रतवारी, प्रशीतकरणगृह, शीतगृह, रायपनिंग चेंबर व पॅक हाऊसची व्यवस्था आहे. येथे प्रक्रिया करून थेट निर्यातीसाठी डाळिंब पाठविता येणार आहे. याचा फायदा उत्पादकांना होईल.आजपर्यंत ३७१ उत्पादकांनी अर्ज सादर केले आहेत. यात वैजापूर तालुक्यातील २८७, फुलंब्री ३१, सिल्लोेड ३१, खुलताबाद ५, कन्नड ५, पैठण १ अशा ३६३ शेतकऱ्यांचे अर्ज मंडळास प्राप्त झाले आहेत. याशिवाय जालना व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी ४ अशा एकूण ३७१ उत्पादकांनी अर्ज भरले आहेत. या सर्वांची माहिती ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट अनार नेट’ या वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे.
डाळिंब निर्यातीसाठी जिल्ह्यातील ३७१ शेतकरी इच्छुक
By admin | Updated: December 7, 2014 00:19 IST