नितीन कांबळे, कडा आष्टी तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली असल्यामुळे तालुक्यात टँकर सुरू करण्यात आले आहेत. या टँकरला ग्लोबल पोझिशनींग सिस्टीम (जीपीएस) यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे टँकरमध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आष्टी तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी मागेल त्या गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या ठिकाणी पाणी उद्भवन आहे. त्या ठिकाणचे नाव , गावाचे नाव , टँकरने किती खेपा मारल्या याचा स्पष्ट उल्लेख करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच टँकरवर जीपीएस मशीन लावावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र टँकरवर हे जीपीएस मशीन बसविण्यात आलेले नसल्याने पाणी वाटपात गैरव्यवहार होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप भाजपाचे राम खाडे यांनी केला आहे. नियमाची अंमलबजावणी केली नाही तर टँकर माफीयांविरोधात उपोषण करणार असल्याचा इशाराही खाडे यांनी दिला आहे. टँकरवर जीपीएस यंत्रणा नसल्याने टँकर किती चकरा मारत आहे, कोठे जात आहे याची माहिती प्रशासनाला उपलब्ध होत नाही. यामुळे पाणी वाटपात गैरव्यवहार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उद्धव सानप म्हणाले, आष्टी तालुक्यात सुरू असणार्या टँकरवर जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. ही यंत्रणा तात्काळ बसवावी, असे संबंधित कर्मचार्यांना सांगितले आहे. जीपीएस यंत्रणा बसविल्यानंतर टँकरची सर्व माहिती प्रशासनाला उपलब्ध होईल.
आष्टीतील टँकर जीपीएस विना
By admin | Updated: May 31, 2014 00:55 IST