आष्टी : आष्टी ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने आष्टीवासीयांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम घोषित होण्याबरोबरच फिल्टर पाण्याचा प्रश्न सोडविण्याची घोषणा लोणीकर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.लोणीकर यांच्या रुपाने परतूर तालुक्यास ३० ते ३५ वर्षानंतर मंत्रीपद मिळाले असून आष्टीवासीयांच्याही त्यांच्याकडून आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या १५ वर्षांपासून आष्टीची ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात असतानाही गावचा विकास मात्र झालेला नाही. आष्टीसाठी भाजप शिवसेना युतीच्या काळात १९१६ मध्ये जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत साडे आठ कोटी रुपयांची फिल्टर पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. त्या अंतर्गत मोंढा भागात जलकुंभ उभारुन फिल्टर प्लांटही सुरु करण्यात आलेला आहे. श्रीष्टी येथील पाझर तलावातून पाणी आणण्यात आले आहे. मात्र आष्टीवासीयांचे फिल्टर पाण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. आजपर्यंत फिल्टर प्लांट सुरु करणे ग्रामपंचायतीला साध्य झालेले नाही. भारत निर्माण योजने अंतर्गत ५० लक्ष रुपये खर्च करुन अंतर्गत पाईपलाईनचेही काम करण्यात आले. आज आष्टीवासीयांना १० ते १२ दिवसाआड पाणी येते. आज मितीला हे पाणी केवळ सांडपाणी म्हणून उपयोग करावा लागतो आहे. फिल्टर बंद असल्याने पाणी दूषित येते. बबनराव लोणीकर यांना पाणी पुरवठा आणि स्वच्छता हे महत्त्वाचे खाते मिळाले असल्याने आष्टीवासीयांच्या अपेक्षा निश्चितच उंचावलेल्या आहेत. स्वच्छ पाणी पुरवठ्यासह आष्टी बसस्थानक, गावातील अंतर्गत रस्ते, स्वच्छता आदी विषयाकडे लोणीकरांनी लक्ष घालावे, यासाठी ग्रामपंचायतच्या सक्षमीकरणाची गरज असून विकासाला प्राधान्य देण्याची मागणी होत आहे. आष्टी येथील खंडेश्वर मंदिरात उद्या २८ डिसेंबर रोजी लोणीकरांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलेले असून या सत्काराच्या कार्यक्रमातच लोणीकर हे आष्टीवासीयांचा जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नाविषयी ठोस कार्यक्रम घोषित करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आष्टीकरांना पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा
By admin | Updated: December 28, 2014 01:13 IST