उस्मानाबाद : सहाव्या वेतन आयोगाचा फरक व पगारीतील फरकाची रक्कम देण्यासाठी शिक्षकाकडून दीड लाखाची लाच घेताना रंगेहाथ जेरबंद करण्यात आलेल्या संस्थाचालकासह महिला सचिवास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़ ही कारवाई बीड येथील एसीबीच्या पथकाने गुरूवारी सायंकाळी शहरातील बँक कॉलनी भागातील सरस्वती विद्यालयात केली होती़पोलिसांनी सांगितले की, उस्मानाबाद येथील नवीन बाल सचिव संस्था संचलित सरस्वती विद्यालयात नेमणुकीस असलेल्या शिक्षकास सहाव्या वेतन आयोगाचा फरक व मागील राहिलेले वेतन मिळाले नसल्याने त्यांनी संस्थेविरूध्द न्यायालयात याचिका दाखल केली होती़ तर संस्थेनेही शिक्षकाविरूध्द न्यायालयात याचिका दाखल करून त्यांना पदावरून कमी केले होते़ न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान तक्रारदारास परत कायम करून सहाव्या वेतन आयोगाचा फरक व मागील वेतन देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते़ तक्रारदारास सहाव्या वेतन आयोगाचा फरक व मागील वेतन असे मिळून जवळपास १२ लाख रूपये मिळणार होते़ त्यामुळे तक्रारदार यांनी संस्थेकडे पैशासाठी मागणी लावून धरली होती़ त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक पवार व सचिव निर्मला हुटगी यांनी बारा लाख रूपयांचा प्रस्ताव पाठवून तो मंजूर करण्यासाठी व संस्था व तक्रारदार यांच्यातील एकमेकाविरूध्द न्यायालयात सुरू असलेले प्रकरण तडजोड करण्यासाठी दहा लाख रूपये लाचेची मागणी केली़ त्यानंतर सदर शिक्षकाने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली होती़ तक्रारीनंतर बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक खेडकर व त्यांच्या पथकाने गुरूवारी सायंकाळी बँक कॉलनी परिसरातील सरस्वती विद्यालयात सापळा रचला़ विद्यालयाच्या सहशिक्षिका तथा संस्थेच्या सचिव निर्मला हुटगी यांनी तक्रारदार महिलेकडून दीड लाखाची लाच स्वीकारताच कारवाई करून त्यांना रंगेहात जेरबंद केले़ तसेच संस्थाचालक अशोक पवार यांनाही पथकाने ताब्यात घेतले आहे़ या कारवाईनंतर उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या उपअधीक्षक अश्विनी भोसले व पथकाने सापळ्यानंतरची कारवाई केली़ याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ अटकेतील संस्थाचालक पवार व महिला सचिव हुटगी यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़ तपास एसीबीच्या उपअधीक्षक अश्विनी भोसले या करीत आहेत़ (प्रतिनिधी)
अशोक पवार, हुटगी यांना पोलीस कोठडी
By admin | Updated: June 21, 2014 00:54 IST