जालना : कोणत्याही सामाजिक जनजागृतीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारी कलापथके आज रोजी अडगळीत पडले आहेत. विशेषत: मतदान हक्काविषयी जागृतीसाठी ही पथके मोलाची भूमिका बजावू शकतात. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पथकांकडून जागृतीचे काम बंद झाले आहे. कला आणि कलावंत जगवायचा, असे पूर्वी लोकप्रतिनिधी म्हणत असत. मात्र आता काळानुरूप लोकप्रतिनिधींचाही विचार बदलला, त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्येही लोककला पथके अडगळीत पडल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे.निवडणुकांमध्ये प्रचाराचे साधन म्हणून पूर्वी लोककला पथकांचा मोठा वापर होत होता. अगदी गेल्या १५ वर्षांपूर्वीपर्यंत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये राजकीय पक्षांकडून लोककला पथकांद्वारे प्रचार करण्यात आलेला आहे. प्रचारासोबतच जनजागृतीही होत. ग्रामीण भागात शाहिरी आजही लोकप्रिय आहे. शाहिरी म्हटली की, डफ वाजवत पोवाडे म्हणणारे शाहीर आणि त्यांचा वाद्यसंच असे दृश्य डोळ्यासमोर येते. दोन-तीन तासांच्या कार्यक्रमात विनोदी चुटकुले ऐकवून शाहीर उपस्थितांची मने जिंकत असत. विविध गीतांच्या तसेच कवितांच्या चालिरितीवर शाहीर तसेच पथकातील कलाकार आपली कला सादर करुन वास्तव परिस्थितीचे चित्रण तसेच नागरिकांचे उद्बोधन करीत. लोक विरंगुळा म्हणून अशा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत. विविध राजकीय पक्षांची जी चिन्हे असायची, त्या चिन्हावरील गाणी आजही जुन्या शाहिरांकडे उपलब्ध आहेत. चिन्हाचं नाव घेऊन ‘खूण धर ध्यानी गं, मतदानास चल माझे राणी गं’ असे म्हणून पती आपल्या पत्नीलाही मतदानास घेऊन जातो, असे दृश्य या लोककलांमधून दाखविले जात. संबंधित राजकीय पक्षाने केलेल्या कार्याचा आढावा गीतांच्या रुपानेही शाहीर मांडत. या गाण्यांच्या ओघाने लोकांना मतदानास प्रवृत्त करण्यात येते होते. लोकांकडूनही लोककला पथकांना मोठा प्रतिसाद मिळत असे. आता मात्र निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांकडून लोककला पथकांना अडगळीत टाकल्यासारखीच परिस्थिती असल्याचे येथील काही शाहिरांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कला पथके अडगळीला
By admin | Updated: October 5, 2014 00:48 IST