लातूर : लातूर शहराबाहेरुन जाणाऱ्या वळण रस्त्यासाठी लातूर तालुक्यातील चांडेश्वर, कातपूर, कव्हा, सिरसी, बाभळगाव, आनंदवाडी, सोनवती आदी गावातील १२५ शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे़ या जमिनीचा मावेजा देण्यासाठी संबंधीत शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठविल्या आहेत. बुधवारी २५ ते ३० शेतकऱ्यांनी मावेजासाठी बँकेचे जोडपत्र, सातबारा आणि मतदार ओळखपत्र आदी कागदपत्र उपविभागीय कार्यालयात सादर केली आहेत़ दरम्यान, बाजार भावाप्रमाणे जमिनीला मावेजा मिळाला नसल्यामुळे शेतकरी नाराज असून, न्यायालयात धाव घेण्याच्या ते मनस्थितीत आहेत़ लातूर शहराबाहेरून रत्नागिरी-नागपूर हायवे जात आहे़ या रस्त्याच्या वळणासाठी तालुक्यातील चांडेश्वर, कातपूर, कव्हा, सिरसी, बाभळगाव, आनंदवाडी, सोनवती आदी गावांतील शेतकऱ्यांची जमीन संपादीत करण्यात आली आहे़ संपादीत केलेल्या जमीनीला गुंठा ६ हजार ४५० रुपये शासनाने मंजूर केला आहे़ मंजूर मावेजा घेऊन जा म्हणून या शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठविल्या आहेत़ १८ मार्च पर्यंत उपविभागीय कार्यालयात हजर राहवे व मावेजा घ्यावा़ निषेध व्यक्त करुन ही रक्कम स्विकारण्याचा अधिकार शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी बहाल केला आहे़ सदरची रक्कम स्वीकारुन दिवाणी न्यायालयात जाण्याचा हक्कही अबाधीत ठेवण्यात आला आहे़ मात्र हजर न राहिल्यास मंजूर रकमेवर व्याज न देण्याचा निर्णयही उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला आहे़ दरम्यान, बाजारभावाप्रमाणे किंवा कमी-अधिक मावेजा मिळाला नाही़ म्हणून शेतकरी नाराज आहेत़ दिवाणी न्यायालयात जाण्यासाठी विधिज्ज्ञांसोबत ते चर्चा करीत आहेत़ शहराबाहेरुन जाणाऱ्या वळण रस्त्यासाठी जमिनी संपादित करण्याची गरज नव्हती़ तोंडे पाहून जमिनी संपादीत केल्या आहेत, असा आरोपही काही शेतकऱ्यांनी केला आहे़ १२५ पैकी २५ ते ३० शेतकऱ्यांनी बुधवारी दुपारी ४ पर्यंत मंजूर रक्कम घेण्यासाठी कागदपत्र सादर केली. (प्रतिनिधी)२००९ पासून शेतकऱ्यांना जमिनी संपादनासाठी नोटीस होत्या़ आता संपादीत जमिनीसाठी गुंठा ६ हजार ४५० रुपयाप्रमाणे ८१ आर जमिनीसाठी ५ लाख ३७ हजार ८४० रुपये मंजूर झाले आहेत हा आमच्यावर अन्याय असल्याचे कव्हा येथील शेतकरी भानुदास घार म्हणाले़ सचिन घार म्हणाले, माझीही ८१ आर जमीन संपादीत झाली आहे़ त्यासाठी ५ लाख ३७ हजार ८४० रुपये मंजूर झाले आहेत़ ही रक्कम अपूरी आहे़ दिवाणी न्यायालयात जाण्याचा हक्क आहे़ परंतु हा दावा या पैशावर किती दिवस चालवायचा हा आम्हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे़ कव्हा येथील हमजा उस्मान पठाण म्हणाले, वळण रस्त्यासाठी आमची जमीन घेतली. आमच्या जन्माची भाकर गेली. भरपाई मात्र कमी दिली आहे़ हा शासनाने केलेला अन्याय आहे़ शासनाने ६ हजार ४५० रुपयाच्या दरामध्ये वाढ करावी, अशी मागणीही हमजा पठाण यांनी केली़
शेतकऱ्यांमध्ये नाराजी; पैसे कमी आले !
By admin | Updated: March 19, 2015 00:17 IST