उस्मानाबाद : सततची नापिकी, कर्जाचा डोंगर याला कंटाळलेल्या जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे़ मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता पाहता सिनेअभिनेता अक्षय कुमार याने २ कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती़ उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त २० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारच्या निधीतील प्रत्येकी ५० हजार रूपये प्रमाणे १० लाख रूपये देण्यात आले आहेत़ ही रक्कम थेट संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे़मराठवाड्यातील दुष्काळाच्या दाहकतेबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सिनेअभिनेता अक्षय कुमार यांना माहिती दिली होती़ त्यावेळी अक्षयकुमार यांनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी दोन कोटी रूपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते़ विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांच्याकडून मयत शेतकऱ्यांच्या वारसांची यादी घेतली होती़ जिल्ह्यातील ३० मयतांच्या वारसांची यादी वरिष्ठांकडे पाठविण्यात आली होती़ यातील २० जणांना प्रत्येकी ५० हजार रूपये प्रमाणे अक्षयकुमारकडील आर्थिक मदत देण्यात आली आहे़ यात उस्मानाबाद तालुक्यातील वरूडा, अनसुर्डा, भंडारवाडी, मेडसिंगा, कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी, भोगजी, आंदोरा, वाशी तालुक्यातील तेरखेडा, लाखनगाव, भूम तालुक्यातील आंबी, लोहारा तालुक्यातील कमलापूर, तुळजापूर तालुक्यातील जळकोट, काटगाव, भूम तालुक्यातील दिंडोरी, उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी, येवती, परंडा तालुक्यातील खासगाव, खानापूर, कळंब तालुक्यातील अढाळा येथील मयतांच्या वारसांचा समावेश आहे़ निवडण्यात आलेल्या उर्वरित १० मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही लवकरच निधीचे वाटप करण्यात येणार असल्याचे समजते़ (प्रतिनिधी)
मयत शेतकऱ्यांच्या वारसांना अक्षयकुमार यांची मदत
By admin | Updated: December 28, 2015 23:23 IST