जाफराबाद : जाफराबाद बस आगारामधील डिझेल पंपाच्या टाकीत सांडपाणी गेल्याने ते डिझेलमध्ये मिसळून गेले. ही तांत्रिक बाब आगार व्यवस्थापकाच्या लक्षात न आल्याने हे डिझेल भरून निघालेल्या बसेस रस्त्यावरच एअरलॉक होऊन बंद होत होण्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला.बस आगार ते बसस्थानक यामधील अंतर जवळपास अर्धा कि़मी. आहे. सकाळी धावणाऱ्या बसेस नेहमीप्रमाणे पंपावर डिझेल भरून बाहेर निघत असताना मध्येच बंद पडत असल्याचा प्रकार पाहून ही बाब लक्षात आली.बस आगाराचा डिझेल पंप हा जमिनीलगत व त्याखाली डिझेलची टाकी आहे. जमिनींतर्गत असलेल्या टाकीमध्ये पावसाचे व सांडपाणी गेले. त्यामुळे डिझेल व पाण्याची भेसळ झाली. सदरील डिझेल बसमध्ये भरले गेले. यामुळे बसेस बंद होऊन पडू लागल्या. बुधवारी एकूण सात बस बंद पडल्या होत्या. रस्त्यावरच बस बंद पडल्याने वाहतुकीस अडथळा झाला. यामुळे वाहनधारक व पादचारी यांची चांगलीच तारांबळ उडाली. नादुरूस्त बसेसची रस्त्यावरच तत्काळ दुरूस्ती करण्यात येऊन काही बस टोचन करून बस आगारात सोडण्यात आल्या.सकाळी अचानक नियमित मार्गाने धावणाऱ्या बसेसमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊन आगार व्यवस्थापकांची देखील भांबेरी उडाली. बसेस नादुरूस्त होत असल्याने पर्यायी व्यवस्था करण्यात आली. दिवसभर रिमझिम पाऊस सुरू असल्याने वर्कशॉप कर्मचाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागली.जाफराबाद बस आगाराच्या बसेसची देखील अवस्था वाईट आहे. एरव्ही या बसेस जुन्या आहे. तेव्हा त्या केव्हाही रस्त्यावर बंद पडत असतात. नवीन बसगाड्या घेण्यास प्रशासन पुढे येत नाही. लांब पल्ल्याच्या फेऱ्या व जालना, औरंगाबादसाठी वातानुकुलित बस असायला हव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फारेस चाऊस यांनी केली आहे. (वार्ताहर)शहरातील प्रमुख रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाल्या नाहीत. तसेच आगाराला लागून कृषी उत्पन्न बाजार समिती, तहसील कार्यालय, मुख्य रस्त्यावरील सांडपाणी बस आगार परिसरात येऊन थांबत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्व सांडपाणी बाहेर वाहून न जाता बस आगारात घुसले. त्यामुळे ते पाणी डिझेल टाकीत गेले आहे. तात्पुरती पर्यायी व्यवस्था म्हणून बाहेर सोडण्यात आलेल्या बसेसला सिल्लोड, चिखली, जालना बस आगारात डिझेल भरून घेण्यास सांगितले असल्याचे आगार प्रमुख व्ही.एस. वाकुडे यांनी सांगितले.
डिझेल टाकीत पाणी गेल्याने बस झाल्या ‘एअरलॉक’
By admin | Updated: August 6, 2015 00:04 IST