परंडा : धोकादायकरित्या तारांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीने जोराची धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला होता़ ही घटना घडून तीन दिवसांचा कालावधी लोटत आला तरी परंड्यातील पोलिसांसह संबंधित प्रशासनाला जाग आल्याचे दिसत नाही़ राजरोसपणे धोकादायकरित्या वस्तूंची वाहतूक सुरूच असून, अणखी कोणाचा बळी गेल्यानंतर कारवाई सुरू होणार ? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे़परंडा शहरातून व राज्य मार्गावर लोखंडी सळई, लोखंडी पाईप, पत्रे आदी वस्तूंची ट्रॅक्टर, ट्रक, टमटममधून राजरोस धोकादायक वाहतूक सुरू आहे़ अशा वाहनांमुळे अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होत आहे़ तर उसाच्या मोळ्या पडल्याने अनेकजण जखमी झाले असून, एकाचा जीवही यापूर्वी गेला आहे़ तर तालुक्यातील सोनारी येथील एका युवकाचा शनिवारी शहरानजीक झालेल्या अपघातात धोकादायकरित्या बाहेर ठेवलेल्या सळया छातीत, गळ्यात घुसल्याने मृत्यू झाला होता़ या प्रकारानंतर संतापाची मोठी लाट उसळली होती़ यानंतर तरी पोलिसांसह उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्याची अशा शहरवासियांनी बाळगली होती़ मात्र, कारवाईबाबत झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने याकडे दूर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे़ (वार्ताहर)४शनिवारी घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी शहरातून धोकादायकरित्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसत्र सुरू केले आहे़ उसाची वाहतूक करणाऱ्या चालकांवरही कर्कश आवाज केल्याप्रकरणात कारवाई केली असून, क्षमतेपेक्षा अधिकच्या वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कारवाई करण्यात येणार असल्याचे परंडा पोलिस ठाण्याचे पोनि हानुमंत वाकडे म्हणाले.
युवकाच्या मृत्यूनंतरही प्रशासन झोपेतच
By admin | Updated: December 16, 2014 01:04 IST