जालना : विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊन आदर्श आचारसंहिंता लागू होऊ शकते. तेव्हा निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी या निवडणुकीच्या कामाची तयारी अचूकपणे करावी, असे आदेश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी येथे दिले.जिल्ह्यातील पाच विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत झाली, तेव्हा नायक बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंंग, अप्पर जिल्हाधिकारी गिरी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी (सामान्य शाखा) डॉ. एन.आर शेळके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रमेश कायंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा कोषागार अधिकारी, कल्याण औताडे, उपविभागीय अधिकारी डॉ. हरकर, मंजुषा मुथा, गणेश देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते. ज्या तहसील कार्यालयामध्ये निवडणूक शाखेत नायब तहसीलदार हे पद भरले नसेल तेथे इतरांना अतिरिक्त कार्यभार देण्यात यावा. कोणत्याही प्रकारे निवडण्णुकीचे काम थांबवू नये, आदर्श आचारसंहिता कालावधीतील कामे अचूकपणे करण्यात यावी. यासाठी जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी अचूकपणे द्यावी. या माहितीत त्रुटी असता कामा नये, असे सांगून नायक म्हणाले की, आपापल्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्र बदलावयाचे असतील तर त्याचे प्रसताव विहित स्वरुपात देण्यात यावेत. मतदारांची संख्या अचूक असावी, या निवडणूक व्यवस्थापन आराखडयाचे काम दहा ते पंधरा दिवसात पूर्ण करण्यात यावे, असेही आदेश यावेळी त्यांनी दिले.मत मोजणी केंद्राची जागा निश्चिती करण्यात यावी, निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, पोलीस अधिका-यांना सोबत घेऊन हे काम पूर्ण करावे, संयुक्त पाहणी करावी. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची तयारी करावी, त्याची माहितीही पाठविण्यात यावी. कायदेशीर प्रकारणांचा निपटारा तहसीलदारांनी वेळेवर पूर्ण करुन त्याबाबतचे अहवाल पाठवावेत. निवडणूक खर्चाच्या तपासणीचे काम तालुका कोषागार अधिकाऱ्यांना देतांना त्यांची आदल बदल करावी. आदर्श आचार संहिता कक्षातील क्षेत्रिय अधिका-यांची नेमणूक करावी, त्यांची तपासणी पथक तयार करावीत, जिल्हयाच्या सिमेवर नाकाबंदी करण्यात यावी, निवडणुकीचे काम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात. (प्रतिनिधी)निवडणुकीचे माहिती ठेवण्यासाठी जागा निश्चित कराव्यात, स्ट्राँग रुमच्या जागा निश्चित कराव्यात,वाहतूक आराखडा ,नकाशे तयार करावेत,वाहनांची आवश्यकता नोंदवावी.आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर दोन दिवसाच्या आत सर्व शासकीय कार्यालय,खाजगी मालमत्ता धारकांनी राजकीय पक्षाचे बॅनर,पोष्टर,पेंट केलेली माहिती पुसून स्वच्छ करावी,ज्या अधिका-यांकडून त्यांच्या शासकीय कार्यालयाच्या इमारतीतील किंवा इमारती बाहेरच्या भितींवर मजकूर आढळून येईल त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असे स्पष्ट आदेशही नायक यांनी यावेळी दिले.
निवडणुकीसाठी प्रशासन लागले कामाला
By admin | Updated: August 29, 2014 01:28 IST