जालना: ड्रायपोर्टसाठी राज्य सरकार येत्या आठवडाभरात जालना येथील जमीन जेएनपीटीला हस्तांतरीत करणार आहे. एप्रिलमध्ये या कामाचे भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.शहरापासून १० कि़मी. अंतरावर दिनेगाव शिवारात ५०० एकर जागेवर ड्रायपोर्टच्या उभारणीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. हस्तांतरण प्रक्रियेसाठी शंभर कोटींची तरतूद करण्यात आली असून ड्रायपोर्ट उभारणीच्या पहिल्या टप्प्यात ४०० कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आल्याचे खा. दानवे यांनी सांगितले.गोदाम, कोल्ड स्टोअरेज इत्यादी कामे होणार आहेत.ड्रायपोर्टची निर्मिती म्हणजे मराठवाड्याच्या विकासासाठी एक शुभसंकेत असल्याचे उद्योजकांमधून बोलले जाते. जालन्याची ओळख औद्योगिक शहर म्हणून आहे. येथे उत्पादित माल देशापासून बाहेर देशात मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. सद्य परिस्थितीत माल निर्यात करण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. ५० ते ६० स्टील उद्योग, चार ते पाच बियाणे उद्योग तसेच इतर अनेक उद्योगांमधील निर्मित माल निर्यात होतो. येथे होऊ घातलेल्या ड्रायपोर्टमुळे वेळ आणि पैशाची मोठी बचत होणार आहे. या पोर्टवरुन थेट उत्पादक जेएनपीटी येथे पाठविता येईल. भूमिपूजनाची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)ड्रायपोर्टचे काम दर्जेदार राहील, असा विश्वास व्यक्त करून खा. दानवे म्हणाले, हे काम जलदगतीने पूर्ण व्हावे, यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार आहोत. केंद्र सरकारकडून यासाठी वेळेवर निधी मिळणार आहे. पोर्टमुळे जालन्यासोबत मराठवाड्यातील उद्योजकांचा माल निर्यात करण्यासाठी लागणारा वेळ आणि पैशाची मोठी बचत होईल.
ड्रायपोर्टच्या प्रत्यक्ष कामास एप्रिलपासून होणार प्रारंभ
By admin | Updated: March 30, 2015 00:40 IST