रमेश शिंदे , औसापावसाळा संपतो न संपतो तोच औसा तालुक्यात पाणीटंचाईची सुरुवात झाली. सध्या एका गावात टँकर सुरू आहे. तर अन्य आठ गावांनी पाणी पुरवठ्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. पंचायत समितीने आॅक्टोबर ते जून या ९ महिन्यांचा १ कोटी ९९ लाख ७३ हजार रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. तालुक्याला यावर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून असलेला आहे. या तालुक्यात एकही मोठा प्रकल्प नाही व मोठ्या नद्या नाहीत. तेरणा आणि तावरजा या दोन नद्या तालुक्याच्या दोन टोकांवरून वाहतात. तालुक्यात ११ लघु प्रकल्प व जवळपास ३०० पाझर तलाव आहेत. काही प्रकल्पांत अल्पसा पाणीसाठा आहे. तर बहुतांश प्रकल्प हे कोरडे ठणठणीत आहेत. विहिरी, बोअरच्या पाणीसाठ्यातही वाढ झालेली नाही. त्यामुळे पावसाळा संपतो न संपतो तोच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यापासूनच तालुक्यातील नऊ गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील ९ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असून, २६ सप्टेंबरपासून मासुर्डी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर किनीनवरे येथे दोन तर खरोसा, वांगजी, हिप्परसोगा येथे प्रत्येकी एक अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. उजनी येथे ५, किनीथोट, टाका व हिप्परगा कवळी येथूनही पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव आले असून, या गावाची संयुक्त पाहणी बाकी आहे. पंचायत समितीने आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी २६ लाख २८ हजार, जानेवारी ते मार्च २०१५ या तीन महिन्यांत ६२ लाख ९४ हजार, तर एप्रिल ते जून २०१५ या तीन महिन्यांसाठी १ कोटी १० लाख ५२ हजार असा १ कोटी ९९ लाख ७३ हजारांचा कृती आराखडा तयार केला. यामध्ये पाणीपुरवठा अधिग्रहण, नळयोजना दुरुस्ती यासह विविध कामांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांची बुधवारी आढावा बैठक होत असून, यास मंजुरी मिळणार आहे.
दोन कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा
By admin | Updated: October 28, 2014 00:58 IST