उस्मानाबाद : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील सन २०११-१२ मधील यात्रा अनुदानातील अपहार प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या तत्कालीन पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवकांसह ठेकेदार अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत़ पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीत आजवर दहा जणांचे जबाब नोंदविले असून, आरोपींच्या शोधार्थ दोन पथके रवाना केली आहेत़तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील नगर पालिकेला यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून दीड कोटी रूपयांचे अनुदान देण्यात येते़ या अनुदानातून पाणी, स्वच्छता, दिवाबत्तीसह इतर कामे करण्यात येतात़ शासनाने सन २०११-१२ साली दीड कोटी रूपयांचे यात्रा अनुदान दिले होते़ त्यावेळी हा निधी खर्च झाला नव्हता़ त्यानंतर काही काळातच निवडणूक लागली आणि नंतर सत्तेत आलेल्या नगराध्यक्षांसह तत्कालीन मुख्याधिकारी, लेखापाल, नगरसेवकांनी बोगस बचतगट तयार करून ठेकेदारांकरवी कामे केल्याची बनावट कागदपत्रे तयार करून एक कोटी ६२ लाख रूपयांचा अपहार केल्याची तक्रार राजाभाऊ माने यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली होती़ माने यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन नगराध्यक्षा अर्चना गंगणे, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगळे यांच्यासह संबंधित नगरसेवक, ठेकेदारांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजतिक रोशन यांनी तपासासाठी दोन पथके रवाना केली आहेत़ तर या प्रकरणाच्या चौकशीत आजवर दहा जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत़ मात्र, गुन्हा दाखल होऊन आठवड्याचा कालावधी लोटला तरी या प्रकरणातील एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नसून, तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)
अपहार प्रकरणातील आरोपी अद्याप फरार
By admin | Updated: April 3, 2017 22:39 IST