औरंगाबाद : संवेदनशील अभिनेत्री अमृताच्या गोड उच्चारवाणीने झालेल्या साभिनय अभिवाचनाला शहरातील अभिरुचीसंपन्न अभिजनांनी गर्दी केली. तरीही पीन ड्रॉप सायलेन्स. कानात प्राण आणून एकवटलेल्या नजरा. ती आणि तिच्या आईच्या संवादी शैलीला उत्स्फूर्त दाद, टाळ्या अन् एक-दोन प्रसंगांमध्ये ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा. अभिवाचनाचा एक अभिजात अनुभव शहरवासीयांनी रविवारी अनुभवला. सृजनशील अभिनेत्री अमृता सुभाष लिखित ‘एक उलट-एक सुलट’ या आत्मकथेचे दस्तुरखुद्द अमृता व तिची अभिनेत्री आई ज्योती सुभाष यांनी केलेले अभिवाचन शहरवासीयांना आत्मानुभूतीचा आनंद देऊन गेले. देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात विद्यार्थी व साहित्यदर्दींनीं गर्दी केली होती. अगदी काहींनी उभे राहूनच या अभिवाचनात समरस होऊन आनंद घेतला. या मायलेकींनी आत्मकथनातील ४ प्रसंग वाचले. ज्योती सुभाष यांनी अभिवाचनास सुरुवात करीत अमृताने शालेय जीवनावर रेखाटलेले एक सहज सुंदर चिंतन सांगितले. गे पुरुष व त्यांच्या संदर्भाने अमृताने शब्दांकित केलेला ११ पुरस्कार पटकाविणारा दिग्दर्शक ऋतुपर्ण घोष यांच्याविषयीची कणव ज्योती सुभाष यांनी वाचून दाखविली व सभागृहात टाळ्यांची बरसात झाली. एक सशक्त अभिनेत्री व गोड गळ्याची गायिका अमृता सुभाषच्या प्रवाही लेखनाची प्रचीती शहरवासीयांना आली. तिने तिच्या मनातल्या विचारवादळांना अन् आयुष्यातल्या अनुभवसरींची अक्षरांनीच घडविलेली वीण तिच्या अभिवाचनाने उलगडत नेली. पार बालपणी घरातील उंदीर, मांजरांची वाटणारी भीती. माझ्या भीतीचा आदर सर्वच मुक्या प्राण्यांनी केला. तसाच आदर सर्वच मनुष्यप्राणी करतील का? मनुष्य प्राण्याबाबत आपण ही खात्री देऊ शकतो का? असा उपस्थित केलेला प्रश्न सर्वांच्या मनाला भिडला. राजहंस प्रकाशनचे श्याम देशपांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. रसिका राठिवडेकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
साभिनय अभिवाचनाने अभिजन सद्गदित
By admin | Updated: December 22, 2014 00:04 IST