लातूर : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे दरवर्षी जगातील १० पैकी एकाचा मृत्यू होत आहे़ तसेच विविध कर्करोगी रुग्णांमध्ये ९० टक्के रुग्ण हे तंबाखूच्या व्यसनाचे आहेत़ विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत कर्करोगींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ तंबाखू, गुटखा खाणे, सिगारेट, बिडी ओढणे अशा व्यसनामुळे निकोटीन नावाचा विषारी घटक शरीरात जातो़ तो मेंदूतील स्रायूंना आपल्या नियंत्रणात ठेऊन व्यसनाधिनता वाढवितो़ तंबाखूजन्य पदार्थ खाणार्या स्त्रियांमध्ये नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे़ तंबाखूचे सेवन टाळल्यास जगातील एक कोटी नवजात अर्भकांचे होणारे मृत्यू टाळता येऊ शकतात़ तंबाखू सेवनामुळे शरीरातील नियमित क्रिया बिघडते़ प्रतिकारशक्ती कमी होऊन जखमा दुरुस्त होण्याची प्रक्रिया मंदावते़ जुनाट दमा, रक्तदाब, फुफुसाचा कर्करोग, दमा, ब्रॉकॉयटीस, हार्टअॅटॅक, इम्फायसेमा, घशाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, पॅनक्रियाटिक कॅन्सर होतो़ धुम्रपान सेवन करणार्या व्यक्तीचे आयुष्यमान जवळजवळ १० ते १५ वर्षांनी कमी होते़ धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जवळजवळ २० टक्के आढळून आले आहे़ भारत आणि चीन या दोन देशांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्यांची संख्या जवळपास ५० टक्के असल्याचे आढळून आले आहे़ तंबाखूमुळे प्रामुख्याने तोंडाचा, अन्ननलिकेचा आणि श्वासनलिकेचा कर्करोग होतो़ शरीरातील प्रत्येक अवयवावर तंबाखूचा परिणाम होतो, असे छाती विकार व श्वसनविकार तज्ज्ञ डॉ़ आऱ टी़ भराटे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांपूर्वी गुटख्यावर बंदी घालून विक्री करणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने सन २०१२-१३ मध्ये ६ तर २०१३-१४ मध्ये १८ ठिकाणांवर धाडी टाकून कारवाई केली आहे़ कारवायांमुळे जिल्ह्यातील गुटखा विक्रीचे प्रमाण अल्प झाले आहे़ शासनाच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी दरवर्षी शिबिरे आयोजित करुन लाखो रुपये खर्च करण्यात येतात़ परंतु, या शिबिरांच्या माध्यमातून अपेक्षित असा परिणाम व्यसनांवर झालेला दिसून येत नाही़ व्यसनी लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे टक्केवारीवरुन पहावयास मिळत आहे़ शिवाय शासनाच्या वतीनेही दिनाचे औचित्य साधूनच जनजागृती केली़ त्यामुळे त्याचा परिणामकारक इफेक्ट होत नाही़
कर्करोगींत ९० टक्के तंबाखूचे व्यसनी
By admin | Updated: May 31, 2014 00:56 IST