शिरूर अनंतपाळ : तालुक्यात चालू वर्षात ८४२ मिलीमीटर पाऊस झाला असून तरी जलस्त्रोताची पाणीपातळी झपाट्याने खालावत चालली असल्याने विविध गावातील हातपंत आणि विद्युतपंप कोरडेठाक पडण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढली असल्याने एप्रिल महिन्याअखेर तालुक्यातील एकंदर ८६ हातपंप-विद्युतपंप पाण्याअभावी बंद पडले आहेत. शिरुर अनंतपाळ तालुक्यात ४८ गावे असली तरी ४३ ग्रामपंचायती असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने कमी अधिक प्रमाणात ४० गावांत पाणीटंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, गावात असणारे हातपंप-विद्युतपंप कोरडेठाक पडत चालले आहेत. तालुक्यात एकंदर २१३ हातपंप तर ८० विद्युतपंप आहेत. एप्रिल महिना अखेर ६८ हातपंप आणि १८ विद्युतपंप असे एकंदर ८६ जलस्त्रोत पाण्याअभावी बंद पडले आहेत. (वार्ताहर) २०७ पंप चालू तालुक्यात एकंदर २९३ हातपंप-विद्युतपंप असले तरी, त्यापैकी ८६ पंप बंद पडले असल्याने एकंदरीत केवळ २०६ पंप सुरू आहेत. परिणामी, लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र काही गावातून दिसून येत आहे. पाणी योजना निष्प्रभ तालुक्यातील साकोळ-घरणी धरणात अद्यापि पाणीसाठा चांगल्या स्थितीत असला तरी थकित वीज बिलामुळे साकोळ धरणावरील सातखेडी पाणीपुरवठा योजना निष्प्रभ ठरली असून, वीजपुरवठा खंडित केल्याने गत चार महिन्यांपासून पाणीपुरवठा योजना बंद आहे. तर शिवपूर जलशुद्धीकरण योजना ग्रामपंचायतच्या मागणीअभावी बंद आहे.
८६ हातपंप, विद्युतपंप पाण्याअभावी पडले बंद!
By admin | Updated: May 10, 2014 23:53 IST