विजय सरवदे
औरंगाबाद : बेरोजगारीमुळे नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या तरुणांमध्ये उद्योजकीय अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बजाज इन्क्युबेशन सेंटर विशेष प्रयत्न करीत आहे. दोन वर्षांत या सेंटरकडे उद्योग सुरु करण्यासाठी (स्टार्टअप) प्राप्त ७० ते ८० प्रस्तावांपैकी नावीन्यपूर्ण संकल्पना असलेल्या २४ ‘स्टार्टअप’वर काम सुरू असून, प्रत्यक्षात ८ स्टार्टअप कार्यान्वित झाले आहेत. विद्यापीठ परिसरात सन २०१९ पासून ‘बजाज इन्क्युबेशन सेंटर’ सुरू झाले. बजाज कंपनीच्या ‘सीएसआर’ फंडातून या सेंटरची सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून, संगणकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. सचिन देशमुख हे या सेंटरची जबाबदारी सांभाळत आहेत. सेंटर संबंधी डॉ. देशमुख यांनी सांगितले की, सातत्याने पडणारा दुष्काळ आणि मागील दोन वर्षांपासून होणाऱ्या अवेळी अतिवृष्टीमुळे शेतीवर अवलंबून असलेला हा प्रदेश दुहेरी नैसर्गिक संकटात सापडला आहे. त्यामुळे मराठवाड्यातून पुणे, मुंबई, औरंगाबादसारख्या औद्योगिक शहरांकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. त्यामुळे विद्यापीठाने अन्य शहरांकडे होणारे स्थलांतरण थांबवून उद्योग उभारणी आणि नवीन संकल्पना राबवण्यासाठी या सेंटरच्या माध्यमातून पाऊल उचलले आहे.
केंद्राचे कामकाज कसे चालते
या केंद्रात आलेल्या विद्यार्थ्याची नावीन्यपूर्ण संकल्पना समजून घेतली जाते. त्या संकल्पनेला भवितव्य आहे, अशी खात्री पटल्यास या केंद्राच्या रिसर्च टीमकडे तो प्रस्ताव पाठविला जातो. या टीमकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर त्यावर आणखी सहा महिने रिसर्चचे काम केले जाते. त्यानंतर मार्केटिंग, योग्य पार्टनर कसे शोधायचे, कंपनीचे रजिस्ट्रेशनबाबत काम केले जाते. ‘एनजीओ’, विदेशातील मराठी नवउद्योगांना अर्थसाहाय्य करणाऱ्या व्यक्ती, सरकारी अर्थसाहाय्य करणाऱ्या संस्था यापैकी जे अर्थसाहाय्य करण्यास तयार असेल, त्याचा शोध घेतला जातो व त्यासमोर संबंधित स्टार्टअपचे सादरीकरण तयार करण्याविषयी मदत केली जाते.
कोणते स्टार्टअप बाजारात उतरले
अभिलाष गोजे या विद्यार्थ्याने ‘खाना एनीव्हेअर’ हे सुरू केले आहे. बाहेर गावाहून शहरात महाविद्यालयीन शिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना स्वस्त आणि मस्त भोजन त्यांच्या खोलीवर पोहोच मिळण्यासाठी हे स्टार्टअप काम करते. याच्याकडे सध्या शहरातील ४० मेस आणि पोळीभाजी केंद्र रजिस्टर्ड असून, ऑनलाइन जेवण मागविले की ते ५० ते ८० रुपयांत काही अवधीत त्यांना पोहोच होते. विशेष म्हणजे, अभिलाष याची स्वत:ची मेस नाही ना पोळीभाजी केंद्र. याशिवाय सुरेश सोरमारे या विद्यार्थ्याचे ‘सेहत ईझी’ हे घरपोच औषधी पुरविणे, रुग्णांसाठी दवाखान्यांची अथवा डॉक्टरांची वेळ घेणे तेही शुल्कामध्ये सवलत देऊन. ऑफलाइन असतानाही गडकिल्ल्याचा अचूक मार्ग शोधणे, लिथियम बॅटरी तयार करणे, कृषि क्षेत्रात मधुमासीपासून फळे व भाजीपाला उत्पादनात वाढ, कधी व कोणते पीक घेणे, जमिनीची सुपिकता मोजणे, कोविड टेस्टिंग किट, शेअर मार्केटसंबंधी आदी स्टार्टअप कार्यान्वित झाले आहेत.
उद्योग उभारणीचे प्रशिक्षण देणारे हे केंद्र तरुण उद्योजकांसाठी हक्काचे ठिकाण झाले आहे.