संजय कुलकर्णी , जालनाजिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत जिल्ह्यातील ७० कोल्हापुरी बंधारे व ४ पाझर तलावांची कामे निधी नसल्याने गेल्या दहा वर्षांपासून रखडली आहेत. त्यामुळे १४६२ हेक्टर क्षेत्र कोरडवाहूच राहिले आहे. २००४-०५ मध्ये जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या निधीतून ७० कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. परंतु ही कामे वेळेत सुरू झाली नाहीत. पुढे ती सुरू झाली खरी, मात्र तीही अर्धवट स्थितीत अडकली. नियोजन मंडळाचा निधी दोन वर्षांमध्ये खर्च करावा लागतो. तो ठराविक कालावधीत खर्च न झाल्याने सर्वच कामे रेंगाळली. २०११-१२ मध्ये जिल्हा परिषदेने या कामांसाठी पुन्हा नियोजन मंडळाकडून निधीची मागणी केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी या कामांची तपासणी करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून स्थानिक स्तर लघुपाटबंधारे विभागाच्या तीन पथकांमार्फत या कामांची तपासणी सुरू आहे. या तपासणीमध्ये आतापर्यंत ४० टक्के कामे जमीन पातळीवरच झाल्याचे आढळून आले. उर्वरीत ६० टक्के कामांमध्ये दोन कामे पूर्ण व अन्य कामे अंतिम टप्प्यात असून त्यांच्यावर साडेसहा कोटी रुपये खर्च झाले आहेत. स्थानिक स्तर लघुपाटबंधारे विभाग यांच्यामार्फत ६० कामांची तपासणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे निधी केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेने या अपूर्ण कामांसाठी निधी मिळावा, याकरीता सुरुवातीला जिल्हा नियोजन मंडळाकडे प्रस्ताव सादर केला. परंतु ही कामे जुनी झाल्याने तेथून निधी मिळण्यास अडचण निर्माण झाली. त्यामुळे आता जि.प.ने शासनाकडे बंधाऱ्यांच्या कामांसाठी ४ कोटी ४६ रुपये तर चार पाझर तलावांच्या कामांसाठी २८ लाखांच्या निधीचा नवा प्रस्ताव सादर केला आहे.२००८-०९ मध्ये जिल्हा परिषदेत २३ कोटींचा सिंचन घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हापासून लघुपाटबंधारे विभागाला सलग दोन वर्षे एक पैसाही निधी जिल्हा नियोजन मंडळ किंवा शासनाकडून मिळाला नव्हता. २०१२ व २०१३ मध्ये प्रत्येकी केवळ एक लाखांचा, तर २०१४-१५ मध्ये तीन कोटींचा निधी मंजुर करण्यात आले.कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या या मंजुर कामांमध्ये जालना तालुक्यात २६, बदनापूर २, अंबड ४, घनसावंगी ३, मंठा ३, भोकरदन २३ तर जाफराबाद तालुक्यात ९ कामांचा समावेश आहे. तर पाझर तलावांमध्ये जालना व अंबड प्रत्येकी १ आणि परतूर तालुक्यात २ कामांचा समावेश आहे. कोल्हापुरी बंधारे व पाझर तलावांच्या अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होण्यासाठी आम्ही सुरूवातीला जिल्हा नियोजन व विकास मंडळाकडे निधीची मागणी केली होती. परंतु ही कामे जुन्या काळात मंजुर झालेली आहेत, जुन्या कामांसाठी पुन्हा निधी देता येत नसल्याचे मंडळाकडून कळविण्यात आले. त्यामुळे आम्ही आता ही कामे पूर्ण होण्यासाठी शासनाकडे अपेक्षित निधीचा प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती जि.प. लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वाय.पी. मापू यांनी दिली.
जिल्ह्यात ७० कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे लटकली
By admin | Updated: January 30, 2015 00:49 IST