उस्मानाबाद : शहरासोबतच ग्रामीण भागातील पालकांतही इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आकर्षण वाढू लागले आहे. त्यामुळेच वर्षागणिक इंग्रजी शाळांच्या संख्येत भर पडत चालली आहे. यंदाही नव्याने इंग्रजी शाळा सुरू करण्यासाठी ५० प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक प्रत्येकी १६ तर माध्यमिकसाठी दहा प्रस्ताव दाखल झाले आहेत.नव्याने शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. गतवर्षीप्रमाणेच यंदाही शाळा सुरू करू इच्छिणाऱ्यांची संख्या कमी नाही. दिवसेंदिवस पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडील कल वाढत चालला आहे. परिणामी त्याच गतीने खेडोपाडी इंग्रजी शाळा वाढू लागल्या आहेत. गतवर्षी जवळपास ६५ च्या आसपास प्रस्ताव इंग्रजी शाळा सुरू करण्यासाठी आले होते. यापैकी काही प्रस्ताव त्रुटीमुळे अपात्र ठरले होते. यंदाही इंग्रजी शाळा सुरू करू इच्छिणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. शिक्षण विभागाच्या वतीने आॅनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले असता, जिल्हाभरातून ५० संस्थांनी इंग्रजी शाळांचे प्रस्ताव दाखल केले आहेत. तर उच्च प्राथमिक शाळांसाठी केवळ १६ प्रस्ताव दाखल झाले आहेत. उच्च माध्यमिक शाळांच्या बाबतीतही काही वेगळे चित्र नाही. या शाळा सुरू करण्यासाठीही केवळ सोळाच प्रस्ताव आले आहेत. माध्यमिक शाळा सुरू करण्याची तयारी केवळ सात संस्थांनी दाखविली आहे. प्रस्ताव दाखल करण्याची मूदत सरली असल्यामुळे आता या प्रस्तावांची छाननी करून पात्र, अपात्र असे वर्गिकरण केले जाणार आहे. ज्या प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून येतील, त्यांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. त्यांनतर हे सर्व प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येतील, असे माध्यमिक शिक्षण अधिकारी ए. एस. उकिरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
इंग्रजी शाळांसाठी यंदा ५० प्रस्ताव !
By admin | Updated: August 28, 2014 01:39 IST