जालना : जिल्हा पोलिस यंत्रणेअंतर्गत १३९ रिक्तपदांसाठी ५ हजार ६६ उमेदवारांनी आॅनलाईन प्रणालीव्दारे अर्ज दाखल केले आहेत. या जिल्ह्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या अनुषंगाने जिल्हा पोलिस यंत्रणेने जाहिरातीव्दारे आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. खुल्या प्रवर्गासाठी ६२, अनुसूचित जातीसाठी २३, अनु. जमातीसाठी १३, विमुक्ती जमाती ४, भटक्या जमाती ४, भज (क)५, भज (ड)-३, विशेष मागासप्रवर्गासाठी २, इमावप्रवर्गासाठी २३ असे एकूण १३९ जागांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. १ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ५ मेरोजी आॅनलाईन प्रणालीव्दारे अर्ज मागविण्यास सुरूवात केली. त्यास या जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. १३९ रिक्तजागांसाठी ५ हजार ६६ उमदेवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात ४ हजार ५४९ पुरूष व ५१७ महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, त्यातील १०३ अर्ज रद्द झाले आहेत. तर २२६ अर्ज अपूर्ण असल्यामुळे बाद ठरविण्यात आले आहेत. आता अंतिमत: ४ हजार ८४९ अर्ज या रिक्त पदांसाठी पात्र ठरविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस यंत्रणेने दिली. (प्रतिनिधी) दररोज ७०० उमेदवारांची चाचणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्याने पोलिस यंत्रणासुद्धा चक्रावून गेली आहे. त्यातून उमेदवार निवडीसाठी ६ जूनपासून या अनुषंगाने प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज आहे. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर त्यासंदर्भात तयारीही सुरू झाली आहे. किमान आठ दिवस ही प्रक्रिया सुरू राहील, दररोज ७०० उमेदवारांना बोलाविले जाईल, असा अंदाज आहे.
१३९ पदांसाठी ५ हजार ६६ अर्ज दाखल
By admin | Updated: May 30, 2014 00:27 IST