केवल चौधरी, जालनायेथील स्टील औद्योगिक वसाहतीत ५२ पैकी केवळ ८ कारखाने रात्रपाळीत सुरू आहेत. उर्वरित ४४ कारखाने बंद झाल्याने अनेक कामगार रोजगार नसल्याने आपल्या मूळ गावी परतत आहेत. जागतिक मंदीचा फटका उद्योग व व्यापार क्षेत्राला सहन करावा लागत असल्याचे सांगितले जाते.सळईचे दर मागील काही दिवसांमध्ये लक्षणीय रित्या घसरले. वीज देयके, कामगार मजुरी व बँकेचा हप्ता भरता यावा तसेच उत्पादनातून घट येऊ नये, ही काळजी घेऊन उद्योजक सध्या कारखाने चालवित आहेत. एंगट तयार करणाऱ्या मोठ्या कारखान्यांना सध्या आर्थिक झळ सोसावी लागत आहे. वीज कंपनीचे बंद काळातील देयकेही कंबरडे मोडणारे ठरू शकते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कारखानदार आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र औद्योगिक वसाहतीमध्ये दिसून येत आहे. ४राजुरीचे संचालक डी.बी. सोनी यांनी सांगितले, चीनहून आयात करण्यात आलेली सळई मानांकनास पात्र ठरली नसल्याने त्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. भारतीय मानांकनानुसार ही सळई वापरण्यास अयोग्य ठरली आहे. तिचा वापर धोकादायक ठरू शकतो. आमच्याकडे सध्या उत्पादन चांगले असून गुणवत्तेवर भर दिल्यामुळे आम्ही तग धरून आहोत. ४दिनेश भारूका म्हणाले, केंद्र शासनाने स्थानिक खर्च विचारात घेऊन आयात सळईवर कर लादावा. ज्यामुळे स्थानिक कामगार आणि कारखानदार यांचाही विचार होऊ शकेल. चीनहून सळई आणून विकल्यास भविष्यातही त्याचे विपरित परिणाम भोगावे लागतील. इमारती कमकुवत झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागणार आहे. ४किशोर अग्रवाल म्हणाले, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गत दोन महिन्यात विकासाचे अनेक निर्णय घेतले आहेत. देशातील महामार्ग आणि राज्यमार्ग सिमेंट काँक्रीटचे बांधले जातील. हा निर्णय सर्वच क्षेत्राला लाभदायक आहे. स्टील उद्योगाला मोठी चालना मिळेल. सध्या मात्र जागतिक मंदीमुळे अडचण होत आहे. ४सतीश अग्रवाल व विशाल अग्रवाल यांनी सांगितले, मंदीतून उद्योग व व्यापार क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी केंद्राकडून ४० हजार कोटी रुपयांचे रस्ते विकास कामे सुरू होणे आवश्यक आहे. या कामांना मंजुरी मिळाली मात्र प्रत्यक्ष आदेश जारी करण्यात आले नाहीत. ही कामे सुरू झाली तर स्टील क्षेत्राला दिलासा मिळू शकेल. सध्या सीमेंटही २० रूपयांनी घसरले. एकूण मंदीची लाट सध्या सुरू आहे. ४घनशाम गोयल, अरूण अग्रवाल म्हणाले, मंदीमुळे कारखाने चालविणे अडचणीचे झाले आहे. बहुतांश कामगार परतीवर आहेत. ज्या कामगारांना पूर्णवेळ काम हवे आहे. त्यांना निम्मेही काम मिळेना. सळईला सध्या मागणी नाही. मोठ्या जिल्ह्यातच सळईची मागणी नोंदविण्यात येत आहे. ४नरेंद्र मित्तल यांनी सांगितले, छोटे कारखानदार प्रचंड अडचणीत आहेत. मोठे कारखाने तरी एंगट सहज विकू शकतात. त्यांचा खर्चही भागविता येतो. सळई तयार करणाऱ्या कारखान्यांना रोज माल विकला जाणे आवश्यक आहे. उत्पादनाच्या निम्मीच मागणी बाजारात आहे. बहुतांश कारखाने बंद आहेत. तर काही कारखान्यांचे काम एका शिफ्टवरच सुरू असल्याने तोही त्रास सहन करावा लागत आहे. औद्योगिक वसाहतीतील ५२ पैकी ४४ कारखाने पूर्णत: बंद असून ८ कारखाने केवळ एका शिफ्टवरच सुरू आहेत. एकीकडे रोजगार नसल्याने परप्रांतीय कामगार आपल्या मूळ गावाकडे परतत असताना कारखानदारांना आर्थिक झळ मोठ्या प्रमाणात सहन करावी लागत आहे.
औद्योगिक वसाहतीत ४४ कारखाने बंद
By admin | Updated: November 16, 2014 23:37 IST