लातूर : लातूर शहर महापालिकेकडून बांधकाम परवाना न घेता शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत़ महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्व्हेक्षणात २५० अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत, यापैकी ९० बांधकामांचे पंचनामे करण्यात आले असून १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ ते बांधकाम बंद करून आठ दिवसांत संबंधित मालमत्ताधारकांनी नवीन प्रस्ताव मनपाकडे सादर करावा, अन्यथा सरसकट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले़ महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी बिनबोभाट अनधिकृत बांधकामे सुरू आहेत़ बांधकाम परवान्यासाठी असलेल्या नियम व अटींची पूर्तता न करताच अनेकांनी आपल्या सोयीनुसार बांधकाम हाती घेतले आहे़ यामध्ये काही मोठ्या इमारतींचाही समावेश आहे़ परवानगी न घेताच मर्जीप्रमाणे काम करण्यात येत आहे़ यातून मनपाचा महसूल लाखो रूपयांचा महसूल बुडाला आहे़ बांधकाम करीत असताना पार्किंगची व्यवस्था, रस्ता याशिवाय अन्य काही महत्वाच्या नियमानुसारच सादर करण्यात आलेल्या बांधकाम परवान्याला महापालिका संमती देते. बांधकाम परवान्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी वेळ व पैसा या दोन्ही गोष्टी लागत असल्याने अनेक बांधकामे अनधिकृतपणेच करण्यात आली आहेत. बहुतांश ठिकाणी करण्यात आलेली बांधकामे परवाना एका नकाशाचा अन् काम मात्र दुसऱ्याच पद्धतीने करून घेतले जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. यावर्षीही लातूरकरांना पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्याने प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळेच गेल्या तीन महिन्यांपासून मनपाने बांधकाम परवाने थांबविले आहेत. त्याअगोदर संबंधित विभागात जबाबदार व्यक्तीच नसल्याने काही दिवस बांधकाम परवान्याचा खेळ झाल्याने परवाना काढण्यासाठी मारावे लागणारे खेटे कमी व्हावेत म्हणून अनेकांनी परवाना न घेताच काम हाती घेतले आहे. मनपा प्रशासनाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी दुर्लक्ष होत आहे. परिणामी, अनधिकृत बांधकाम धारकांचे फावले आहे. मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिलेल्या सूचनेनुसार शहराच्या चारही झोनमध्ये अनधिकृत बांधकामांचा सर्वे करण्यात आला आहे. त्यात जवळपास २५० अनधिकृत बांधकाम होत असल्याचे आढळून आले आहे. प्रारंभी बांधकाम थांबविण्याच्या नोटिसा मनपाकडून बजावण्यात आल्या होत्या. मात्र मनपा प्रशासनाच्या नोटिशीला एकाही बांधकाम धारकाने दाद दिली नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामाचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. सूचना देऊनही बांधकाम सुरूच ठेवणाऱ्या चौदा जणांना शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २५० बांधकामांपैकी शंभर बांधकामांचे पंचनामे पूर्ण झाले आहे. उर्वरित बांधकामांचेही पंचनामे सुरू आहेत. संबंधितांनी अनधिकृत बांधकाम थांबवून तात्काळ सुधारित नकाशा तयार करून तो आठवडाभरात महापालिकेकडे सादर करावा. सध्या पाणीटंचाई असल्याने तात्पुरते परवाने थांबविण्यात आले आहेत. चांगला पाऊस पडताच बांधकाम परवाने दिले जातील. अनधिकृत बांधकाम धारकांनी कारवाई टाळण्यासाठी काम थांबवून तात्काळ सुधारित बांधकाम परवान्याचा प्रस्ताव महापालिकेकडे द्यावा, असे आवाहन आयुक्त तेलंग यांनी केले आहे. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नात अनधिकृत बांधकामांमुळे खिळ बसली आहे. शिवाय, मनमानी कामे करून घेण्यात येत असल्याने बांधकामधारकांचे फावत आहे.४ मनपाकडून बांधकाम परवाना न घेता अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या ‘त्या’ २५० बांधकाम धारकांना सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय, झोननिहाय पंचनामा करण्याचे कामही सुरू आहे. ९० ते १०० बांधकामांचे पंचनामे पूर्ण झाले असून, १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित लोकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. मनपाकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी संबंधितांनी सुधारित नकाशा तयार करून तो परवान्यासाठी महापालिकेकडे सादर करावा. आठवडाभरात ज्यांचा प्रस्ताव येईल, त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, असे आयुक्त तेलंग यांनी सांगितले.
‘त्या’ २५० जणांवर गुन्हे दाखल होणार !
By admin | Updated: March 15, 2015 00:39 IST