नांदेड : गणेशोत्सव, दुर्गोत्सव आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २१ अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे़ तर तब्बल ४६२ तडीपारीचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत़ आचारसंहितेच्या कालावधीत जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी विशेष लक्ष राहणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीधर पवार यांनी दिली़पोलिसांनी पाठविलेल्या गुन्हेगारांच्या तडीपारीच्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण दाखवित उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेकडो प्रस्ताव फेटाळले आहेत़ यापूर्वीही अनेकवेळा असाच प्रकार पहावयास मिळाला होता़ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहेत़ त्याचबरोबर पॅरोलवर सुटलेल्या कैद्यांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे़ पोलिसांकडून दररोज शहरात रात्री अकरा वाजेनंतर नाकाबंदी करण्यात येत आहे़ शहरात दाखल होणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक याची माहिती मिळविण्यासाठी गुप्त बातमीदारांना अलर्ट करण्यात आले आहे़ अवैध धंद्यांना आवर घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथके जिल्हाभरात गस्त घालत आहेत़ निवडणुका शांततेच्या वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलिस दलाकडून प्रयत्न केले जात असल्याचेही पवार म्हणाले़ (प्रतिनिधी)
२१ अट्टल गुन्हेगार तडीपार
By admin | Updated: September 24, 2014 00:17 IST