संजय कुलकर्णी , जालना४५ हजार मालमत्ताधारकांच्या या शहरातील २०० मालमत्ताधारक गायब असल्याने त्यांच्याकडील कर वसुल करण्यासाठी नगरपालिका पथकाची मोठी अडचण होत आहे. काही महिन्यांपूर्वी या मालमत्तांवर नोटिसा लावून पंचनामा करूनही अद्याप काहीच प्रतिसाद मिळालेला नाही.शहरातील १२५० मालमत्ता कुठल्या ना कुठल्या वादात अडकलेल्या आहेत. यामध्ये काही इमारतींबाबत न्यायालयात प्रकरणे सुरू आहेत. काही इमारती जीर्ण अवस्थेत असून तेथे वास्तव्यास कुणीही नाही. काही मोजक्या संकुलांमधील मालक अन्य ठिकाणी स्थलांतरीत झालेले आहेत. त्यामुळे तेथेही पालिकेला कर वसुली करताना अडचण येत आहे. २०० मालमत्ताधारकांनी अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतर केले, मात्र त्यांचा शोध लागत नाही. एकूण थकबाकीमध्ये दीड कोटींची रक्कम या मालमत्ताधारकांकडे आहे. गेल्या १० महिन्यांच्या काळात शहरातील आठ हजार थकबाकीदार मालमत्ताधारकांना पालिकेच्या वतीने जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ३ कोटींची वसूली झाली. परंतु बहुतांश जणांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कर वसुली पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.नगरपालिकेची १८ कोटींची थकबाकी बहुतांश मालमत्ताधारकांकडे थकीत आहे. सातत्याने मोहीम राबविण्यात येत असल्याचा दावा पालिकेकडून केला जातो. मात्र त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ज्या मालमत्ता धारकांचा शोध लागत नाही, त्यांच्या मालमत्तांवर आम्ही नोटिसा डकविल्या व पंचनामाही केलेला आहे. या मालमत्ता धारकांविषयी त्या परिसरातील नागरिकांकडून निश्चित माहिती मिळालेली नाही. मात्र नगर भूमापन कार्यालयाच्या मदतीने आम्ही त्यांचा शोध घेणार आहे.-के.के. आंधळे, कर अधीक्षक
२०० मालमत्तांचे मालक ‘गायब’!
By admin | Updated: February 11, 2015 00:26 IST