विकास राऊत, औरंगाबाद महापालिके ने २०१२ च्या सप्टेंबर महिन्यापासून २०० कोटी रुपयांच्या व्याज व मुद्दलापोटी ७२ कोटी रुपये अदा केले आहेत. कर्ज काढून उभारण्यात आलेल्या २०० कोटींतून ३ कोटी ६० लाख मनपा दरमहा फेड करीत आहे. एलबीटी भरण्यासाठी व्यापार्यांनी हात अखडता घेत आंदोलनाचे हत्यार उपसल्याने पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्यास व्याजाची रक्कम कशी देणार, असा प्रश्न असून, मनपाने एलबीटीचे खाते कर्ज देणार्या आयडीबीआय या बँकेशी संलग्न केले आहे. एलबीटीतून अगोदर २०० कोटींच्या व्याजाचा हप्ता कपात होतो. त्यानंतर उर्वरित रक्कम पालिकेला वापरता येते. एलबीटीतून कमी उत्पन्न झाल्यास पालिकेत बोंबाबोंब होणार आहे. १० वर्षे त्या कर्जाची परतफेड करण्याची मुदत आहे. त्यासाठी मनपाने काही महत्त्वाच्या मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवल्या आहेत. १०० कोटी रुपये महावितरणची देणी आणि १०० कोटी रुपये समांतर जलवाहिनीसाठी मनपाने कर्ज काढून उभे केले. त्यातील महावितरणचे ३५० कोटी रुपयांचे कर्ज वनटाईम सेटलमेंट करून १०० कोटी रुपये अदा करण्यात आले. राज्यात विजेची थकबाकी देणारी औरंगाबाद मनपा प्रथम ठरली. मात्र, त्याचा फायदा म्हणून मनपा कर्जबाजारी होत गेली. त्याचा परिणाम विकासकामांवर झाला आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार ७२ कोटी फक्त व्याजच नसून त्यातून काही मुद्दलचीही परतफेड केली आहे. मात्र, २०१२ पासून आजवर पालिकेच्या तिजोरीतून १२० कोटींची रक्कम गेली हे खरे आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले. त्यातून तत्कालीन आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर आणि खा.चंद्रकांत खैरे यांच्या मध्यस्थीने महावितरणला १०० कोटींचा धनादेश देण्यात आला. मुळात ती थकबाकी देण्याची गरज नव्हती, असे विरोधकांचे मत होते. १ कोटी ८० लाख रुपयांचा हप्ता त्यावेळी पालिकेला सुरू झाला. त्यानंतर मार्च २०१३ मध्ये समांतर जलवाहिनीसाठी १०० कोटींचे कर्ज काढण्यात आले. ती योजना अजून कागदावरच आहे. पालिका १ कोटी ८० लाख रुपयांचा कर्जाचा हप्ता मात्र नियमित भरणा करीत आहे. आयुक्त म्हणाले... २०० कोटी रुपयांसाठी नुसतेच व्याजाचे हप्ते भरलेले नाहीत. सोबत मुद्दलही भरणा केली जात आहे. परंतु पालिकेची मोठी रक्कम कर्जफेडीत जात आहे, असे डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले.
२०० कोटींच्या कर्जात बुडतेय जहाज
By admin | Updated: May 13, 2014 01:00 IST