वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातून दमणकडे बीअर घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकावर विटांचा वर्षाव करीत त्यास गंभीर जखमी करून व चाकूने वार करून १९ हजार रुपये लुटल्याची घटना आज मध्यरात्री मुंबई-नागपूर महामार्गावरील साजापूर फाट्यावर घडली.संतोष दीपचंद राठोड (२९, रा. तीसगाव तांडा, ता. खुलताबाद) हा काल १ सप्टेंबर रोजी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील काल्स बर्ग या बीअरच्या कंपनीमधून बीअरचे बॉक्स ट्रक क्रमांक एम. एच.-२०, बी. टी.-१८८७ मध्ये भरून दमणकडे माल पोहोचता करण्यासाठी निघाला होता. मुंबई-नागपूर महामार्गावरून दमणकडे जात असताना मध्यरात्री १.४५ वाजेच्या सुमारास साजापूर फाट्यावर चार दरोडेखोरांनी या ट्रकवर चालक बसलेल्या ठिकाणी विटांचा वर्षाव सुरूकेला.या विटांमुळे ट्रकच्या खिडकीची काच फुटून चालक संतोष राठोड याच्या डोक्यात वीट लागल्यामुळे त्याने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबविला. त्यामुळे धावत आलेल्या चार दरोडेखोरांपैकी दोघा दरोडेखोरांनी ट्रकच्या केबिनमध्ये धाव घेऊन ट्रकचालकाला बेदम चोप दिला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात चार दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार व्ही. एस. जाधव हे करीत आहेत.दरोडेखोरांनी चालक संतोष राठोड याच्या गळ्यावर चाकूने वार करून त्यास गंभीर जखमी करून त्याच्या खिशातील १९ हजार काढून घेत ते अंधारात पसार झाले. या घटनेमुळे घाबरलेल्या जखमी ट्रकचालकाने या घटनेची माहिती ट्रक मालकाला दिली. ही माहिती मिळताच ट्रक मालकाने घटनास्थळी धाव घेऊन या दरोड्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना देऊन संतोष यास शासकीय रुग्णालयात दाखल केले.
ट्रकचालकाचे १९ हजार लुटले
By admin | Updated: September 2, 2014 01:54 IST