उस्मानाबाद : चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याकडे थकित ग्रामपंचायत कराची पन्नास टक्के रक्कम ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार कळंब तसीलदारांनी ग्रामपंचायतीचे सरपंच अॅड. मिराजी मैंदाड यांच्याकडे १४ लाख ४९ हजार १३७ रूपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे. चोराखळी ग्रामपंचायतीकडून धाराशिव साखर कारखान्याकडे थकित असलेल्या ग्रामपंचायत कराची रक्कम मिळावी, म्हणून मागील तीन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत होता. या प्रकरणी ग्रामपंचायतीचे सरंपच अॅड. मैंदाड यांनी हे प्रकरण शासन दरबारीही मांडले होते. त्यानुसार ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या बाजुने निकाल दिला होता. सदरील निकालाविरूद्ध कारखान्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. सदरील याचिकेवर १२ जून २०१४ रोजी न्यायालयाने निर्णय दिला. जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे जमा असलेल्या रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीला अदा करून उर्वरित रक्कम औरंगाबाद खंडपीठामध्ये जमा करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तहसीलदार कळंब यांनी १३ आॅगस्ट रोजी चोराखळी ग्रामपंचायतीचे सरपंच अॅड. मिराजी मैंदाड यांच्याकडे १४ लाख ४९ हजार १३७ रूपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे. तसेच उर्वरित रक्कम खंडपीठ औरंगाबाद येथे जमा करण्यात आली आहे. कराची सदरील रक्कम मिळाल्यामुळे गावामध्ये विविध विकास कामे राबविता येणार असल्याचे अॅड. मैंदाड यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
कराचे १४ लाख रुपये ग्रामपंचायतीकडे सुपूर्द
By admin | Updated: August 24, 2014 00:17 IST