औराद बाऱ्हाळी : फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीटीमुळे कर्नाटकातील औराद बाऱ्हाळी तालुक्यातील ८ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते़ या शेतकऱ्यांना १० कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यात आल्याची माहिती आमदार प्रभू चव्हाण यांनी गुरुवारी दिली़औराद बाऱ्हाळी तालुक्यात मागील रबी हंगामात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती़ या गारपिटीत शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, तूर, ज्वारी, करडई या पिकांसह केळी, द्राक्ष, डाळिंब या फळपिकांचेही नुकसान झाले होते़ तब्बल ८ हजार शेतकऱ्यांच्या १७ हजार एकरवरील हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले़ त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात अडकला होता़ दरम्यान, यासंदर्भात आमदार प्रभू चव्हाण यांनी महाराष्ट्राप्रमाणे हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी लावून धरली होती़ त्याअनुषंगाने कर्नाटक शासनाने हेक्टरी १५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी मान्य केली़ त्यानुसार सर्वेक्षण करण्यात आले़ तालुक्यातील सर्वाधिक नुकसान कुशनूर व कमलनगर सर्कलमध्ये झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले़ या सर्वेप्रमाणे औराद बाऱ्हाळी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आले आहे़ तब्बल १० कोटी रुपये नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळाल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले़(वार्ताहर)