पांदण रस्त्याचे काम : जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रारतळोधी (बा.) : येथून जवळच असलेल्या सावरगाव येथील ३०० मजुरांनी सतत सात दिवस पांदण रस्त्यांचे नियमित मातीकाम केले. परंतु या कामाला अडीच वर्षापेक्षा अधिक कालावधी पूर्ण होवूनही मजुरांना मजुरी प्राप्त झाली नाही. त्यामुळे सदर मजुरांची मजुरी त्वरित मिळावी व या दिरंगाईबद्दल जबाबदार असलेले तत्कालिन ग्रामेसवक पिल्लेवार यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी नागभीड तालुका भाजपाध्यक्ष तसेच जिल्हा दक्षता समिती सदस्य होमदेव मेश्राम यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.१८ मार्च २०१३ ते २४ मार्च २०१३ या कालावधीत सावरगाव येथील माणिक कुंभरे यांच्या शेतापासून पांदण रस्त्याचे मातीकाम मग्रारोहयो या योजनेतून ३०० मजुरांनी केले. आणि काम सुरू झाल्यापासून १५ दिवसांच्या आत मजुरी वितरित करण्याचे शासनाचे आदेश आहेत. तरीपण आज अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही मजुरांना मजुरी मिळाली नाही. या संदर्भात संबंधित मजुरांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन दक्षता समिती सदस्य तसेच नागभीड तालुका भाजपाध्यक्ष होमदेव मेश्राम यांनी २८ सप्टेंबर २०१५ रोजी दक्षता समितीच्या बैठकीत विषय उपस्थित करुन शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. यावेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती नागभीड यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले होते व चौकशी अहवालानुसार १८ मार्च २०१३ ते २५ मार्च २०१३ या कालावधीतील मॅन्युअल मस्टर तथा ई- मस्टर काढल्याचे दिसून येत नाही. तसेच याबाबत रोजगार मागणीचे अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाही तर सरपंच प्रविण खोब्रागडे यांनी मजुरी काढून देण्याचे तोंडी आश्वासन दिले. परंतु आजतागायत मजुरांची मजुरी दिली नाही. सदर कालावधीत मजूर कामावर असल्याचे मस्टर किंंवा कोणताही पुरावा ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाही. परंतु शाखा अभियंता तथा तांत्रिक अधिकारी मरेगा पंचायत समिती नागभीड यांनी मोजमाप पुस्तिका क्र. ०५ वर सदहू कामाचे मूल्यांकन करुन दिले आहेत.शासन निर्णय क्र. मग्रारोहयो २०११/प्र.क्र. ४०/रोहयो १० अ दिनांक २ मे २०११ व शासन निर्णय क्र. मग्रारोहयो २०११/प्र.क्र. ५४-७/रोहयो १० अ १७ मे २०१२ अन्वये सर्वप्रथम नोंदणीकृत मजुरांची मागणी उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायत पातळीवर सर्व प्रकारचे अभिलेख तयार करणे व जतन करणे, ग्रामसेवक रोजगार सेवकाने ग्रामसेवकाच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या नोंदी व अभिलेख योग्य प्रकारे सांभाळण्याचे काम रोजगार सेवकाने करावे, मजुरांचे हजेरी फलक तयार करणे, भरणे व सांभळणे व इतरही अनेक जबाबदारी पार पाडणे आदी कामे रोजगार सेवकाची आहे. मात्र प्रति स्वाक्षरीबाबत ग्रामपंचायत यंत्रणा, ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक व यंत्रणाचे तांत्रिक अधिकारी यांची आहे. परंतु सदर कामे सुरू असताना रोजगार सेवक व ग्रामसेवकांनी आपल्या कर्तव्यास कसूर केल्याचे चौकशी अहलवातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र मग्रारोहयो अधिनियम २००५ अन्वये रोजगार सेवक तसेह महाराष्ट्र शासन जिल्हासेवा (शिस्त व अपिल) १९६४ च्या नियम ३ व ४ नुसार ग्रामसेवक कारवाईही पात्र असल्याचे दिसून येत आहे. या चौकशी अहवालाच्या आधारे १८ ते २३ मार्च २०१३ या कालावधीतील ३०० मजुरांची मजुरी त्वरित देण्याची मागणी मेश्राम यांनी केली. (वार्ताहर)
कामगार मजुरीविनाच
By admin | Updated: December 20, 2015 00:48 IST