शेतकऱ्यांचेही हाल : गतवर्षीच्या अत्यल्प पावसामुळे जलसाठे कोरडेचंद्रपूर : मान्सून आला, असे हवामान खात्याने सांगितले असले तरी चंद्रपूर जिल्ह्यात वरूणराजाची अवकृपा कायम आहे. सर्व अंदाजाला चकमा देत पाऊस जिल्ह्यालाही हुलकावणी देत आहे. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर जिल्ह्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाईची स्थिती उद्भवणार आहे. मागील वर्षी पावसाळ्यात वेळेवर पाऊस पडेल, असाच अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे सर्व कामे आटोपून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत बसला. मात्र मृग नक्षत्रात पाऊस बरसलाच नाही. त्यानंतरही पावसाने उशिराच हजेरी लावली. उशिरा आलेल्या या पावसात शेतकऱ्यांनी बि-बियाणे पेरले. त्यानंतर पावसाची गरज होती. मात्र त्यावेळीही पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली. मध्यंतरीच्या काळात बऱ्यापैकी पाऊस पडला. मात्र तेवढ्या पावसाने जलसाठ्यात मुबलक पाणी साठू शकले नाही. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. अगदी परतीचा पाऊसही समाधानकारक पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. डिसेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला होता. फेब्रुवारी, मार्च महिन्यात तर स्थिती आणखी बिकट झाली होती. नलेश्वर, चंदई, लभानसराड यासह आणखी दोन प्रकल्प कोरडे पडले होते. नदी, नाले, तलाव, बोड्या हे ग्रामीण भागातील जलस्रोत चिंताजनक स्थितीत आले होते. आताही पाण्याची स्थिती नाजुकच आहे. ग्रामीण भागातील जलस्रोट आटले आहेत. नदी-नाल्यांसोबतच नागरिकांच्या घरातील विहिरी, बोअरवेल यांचेही पाणी कमी झाले आहे. एकूणच पाण्याची पातळीच खोल गेल्याने याचा सर्व जलस्रोतांवर परिणाम झाला आहे. जिवती, कोरपना तालुक्यातील परिसर पहाडी भाग आहे. या परिसरातील अनेक गावातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. आदिवासींचे गुडे पाण्याविना टाहो फोडत आहे. विशेष म्हणजे, या गुड्यातील नागरिकांना चक्क डबक्यातील पाणी पिऊन आपली व कुटुंबियांची तहान भागवावी लागत आहे. उन्हाळाभर पहाडासोबतच अनेक भागातील नागरिक पाण्यासाठी ओरडत राहिले. मात्र संबंधित पाणी पुरवठा विभागाने लक्ष दिले नाही. पाणी टंचाई आराखडा कागदावरच राहिला. जिवती, कोरपना, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही या तालुक्यातीलही अनेक गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तर काही केले नाही. आता निसर्गही कोपू लागला आहे. मान्सूनची तारीख ओलांडून दहा दिवसांचा कालावधी लोटत आला आहे. हवामान खाते म्हणते मान्सून आला. मात्र जिल्ह्यात चक्क उन्ह तापत आहे. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर अनेक गावात पाण्यासाठी हाहाकार माजणार, एवढे मात्र निश्चित. (शहर प्रतिनिधी)हजारो हातपंप बंदजिल्हा परिषदेकडून पाणी टंचाईचा आराखडा तयार करून उपाययोजनेसाठी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला जातो. त्याला मंजुरीही मिळते. मात्र परिस्थितीत काहीही फरक पडत नाही. उन्हाळाभर नागरिकांची भटकंती थांबत नाही. यंदाही ती थांबली नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठा आधार असलेले हातपंप अखेरची घटका मोजत आहेत. जिल्ह्यातील असे हजारो हातपंप अनेक वर्षांपासून बंद आहेत. आराखड्याची अंमलबजावणी तर सोडा, साधे बंद असलेले हे हातपंप दुरुस्तीचे सौजन्य आजवर जिल्हा परिषदेने दाखविले नाही. शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकटप्रारंभापासूनच यावर्षी मुबलक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खाते वर्तवित राहिले. मान्सून १८ जूनपर्यंत विदर्भात दाखल होईल, असाही अंदाज यापूर्वी वर्तविण्यात आला होता. त्यामुळे बल्लारपूर, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, भद्रावती, वरोरा आदी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र पाऊसच आला नाही. त्यामुळे उन्हात बियाणे करपू लागले आहे. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.
पाऊस लांबला तर पाणी प्रश्न पेटणार
By admin | Updated: June 21, 2016 00:39 IST