धान शेतीबरोबरच मत्स्यपालन : बकरी व कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी राजू गेडाम मूल पुणे येथे स्पर्धा परीक्षेचे दोन वर्षे शिकवणी वर्ग लावून यशस्वी होण्याच्या मार्गावर असताना गावाची ओढ त्याला सुटत नव्हती. शेती समृद्ध करण्याचा ध्यास उराशी असल्याने अधिकारी होऊन इतरत्र भटकण्यापेक्षा गावातच समृद्ध शेती असे मनोमन त्याचे विचार असायचे. त्यामुळे त्याने अवघ्या दोन वर्षात गावातील आठ एकर शेतीत धान पिकाबरोबरच मत्स्यपालन, बकरी पालन, कुकूटपालन व्यवसाय यशस्वी करण्यात यश मिळविले. प्रयत्नाचा ध्यास घेऊन नोकरीकडे न वळता शेती समृद्ध करणारा प्रशांत बालाजी मेश्राम असे युवकाचे नाव असून तो मूल तालुक्यातील मारोडा येथील रहिवासी आहे. प्रशांतचे वडील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. घरी शेती असतानाही प्रशांतचे त्याकडे फारसे लक्ष नव्हते. वडील आणि लहान भाऊ शेतीकडे बघायचे. प्रशांतला स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनायचे असल्याने त्याने पुणे व नागपूर येथे शिकवणी वर्ग लावले. मात्र यशस्वी होण्याच्या मार्गावर असताना इतर मित्रांकडून शेती विषयक माहिती कानावर पडत असल्याने अधिकारी होऊन इतरत्र भटक्यापेक्षा त्यांनी आपल्या गावात जावून शेती समृद्ध करण्याचा निश्चय केला. त्याने आपल्या आठ एकर शेतीचे निरीक्षक करुन मोटार पंपाची व्यवस्था करून सिंचन व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न चालविला. सिंचन व्यवस्था केल्यानंतर शेततळ्याची निर्मिती केली तसेच बकरी पालन करण्यासाठी शेडची निर्मिती करण्यासोबतच विविध प्रजातीचा कोंबड्या पालनासाठी आणल्या. गोटफार्ममध्ये यशस्वी वाटचाल असून दोन बॅच निघाल्या आहेत. तसेच कडकनाय, गिरीराज, आर.आय.आर या प्रजातीच्या कोंबड्याची सुद्धा निर्मिती झाली आहे. दोन शेत तलावात रोहू, कतला व मांगूर या प्रजातीची मासे जवळपास चार हजार टाकण्यात आले आहेत. धान शेती दीड एकर क्षेत्रात घेऊन उर्वरीत शेतात गोटफार्म, मत्स्यपालन, तुरी, भाजीपाला अशा विविध कल्पना साकारुन नवनविन तंत्रज्ञान विकसीत करण्याचा प्रयत्न प्रशांत करताना दिसत आहे. तसेच याच शेतीत अंडे डबवणी केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. कुकुट पालनासाठी एक दिवसाचे कोंबडीचे पिल्ले नागपूर किंवा इतर राज्यातून आणावे लागते. त्यासाठी इतरांना त्रास सहन करावा लागतो. हे हेऊन डबवणी केंद्र निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
ध्येयवेड्या तरुणाने आठ एकर शेती केली समृद्ध !
By admin | Updated: December 26, 2016 01:14 IST