प्रकाश काळे गोवरीदमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सध्ध्या काकुळतीला आला आहे. चातकासारखी पावसाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजाची स्पंदने वाढायला लागली आहेत. मात्र पाऊस येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शनिवारी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. परंतु बहुतांश भागात हा पाऊस १० ते १५ मिनिटेच पडल्याने प्रखर उन्हामुळे शेतात टाकलेली कपाशीची बियाणे उमलण्यापूर्वीच कोमेजली आहेत. अपुऱ्या पावसाने शेतकऱ्यांचा घात झाल्याने दुबार पेरणीचे संकट अटळ आहे.शेतकऱ्यांना पाऊस येण्याची प्रतीक्षा असतानाच हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दगा दिला. यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस पडेल, असे भाकीत वर्तविले होते. मात्र जूनच्या सुरुवातीला आलेला पाऊस अचानक गायब झाला. निसर्गाचा फेराच यावर्षी उलटा पडल्याने जमिनीत कोरड्यावर टाकलेले महागडे बियाणे उमलण्यापूर्वीच मातीमोल झाले आहे. शेतकऱ्यांवरचा कर्जाचा डोंगर वाढत असतानाच निसर्ग शेतकऱ्यांना साथ देईल, असे वाटले होते. मात्र निसर्गही लहरीपणासारखा वागायला लागल्याने शेतकऱ्यांना मायेचा हात देणाराही कुणी उरला नाही. शेतकऱ्यांच्या संकटाची मालिका पाठ सोडायला तयार नाही. शेती कसायची इच्छा मनात नसतानाही यावर्षी शेतकऱ्यांनी शेती केली. उसनवारीने पैशांची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. आता शेतकऱ्यांजवळ एक छदामही पैसा शिल्लक राहिला नाही. त्यामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे.हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकरी संभ्रमात आहेत. ४८ तासांत विदर्भ, कोकण, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला होता. मात्र दोन दिवस उलटून गेल्यानंतरही पावसाचा एक थेंबसुद्धा पडला नाही. विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा हे तालुका पांढऱ्या सोन्यासाठी अग्रेसर मानले जातात. कापूस या नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. मात्र यावर्षी पावसानेच दगा दिला. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीच्या बियाणांची लागवड केली. तब्बल १५ दिवसांनंतर शनिवारला पावसाने काही भागात हजेरी लावली तर बहुतांश भागात १० ते १५ मिनिटे पाऊस पडून निघून गेला.कपाशीचे पीक जमिनीतून वर येण्यासाठी एक-दोन दिवसाआड पाऊस येणे शेतकऱ्यांना अपेक्षित असते. कोरड्या जमिनीवर टाकलेल्या बियाण्यांना कोंब अंकुरले आहे. मात्र प्रखर उन्हामुळे कपासीचे कोंब जमिनीतच कोमेजून गेले आहे. महागडे बियाणे अपुऱ्या पावसाने जमिनीतच मातीमोल झाले आहे. कृषी केंद्र संचालकही शेतकऱ्यांना उधार बियाणे देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: हताश झाला आहे. अपुऱ्या पावसाने घात केल्याची प्रतिक्रिया तमाम शेतकरी वर्गात उमटली आहे.
१० मिनिटांच्या पावसाने केला शेतकऱ्यांचा घात
By admin | Updated: June 22, 2016 01:20 IST