लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कोळसा खाण कामगारांचा १९ जूनपासून प्रस्तावित संप स्थगित करण्यात आला आहे. भारतीय कोळसा खाण मजदूर संघाने हा संप तीन महिन्यांपर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. भारतीय मजदूर संघ इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, हिंद मजदूर सभा, आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आणि सीटू या केंद्रीय कामगार संघटनांनीही १९ ते २१ जून या कालावधीमध्ये कोल इंडिया कामगारांचा देशव्यापी संप पुकारला होता. कामगारांच्या मागण्यासंदर्भात रविवारी कोळसा मंत्रालयाचे सचिवांशी कामगार युनियनच्या संघर्ष समिती आणि कोळसा खाण व्यवस्थापन यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये ७ मागण्यांवर निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोळसा कामगारांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत तीन महिन्यांसाठी प्रस्तावित संप स्थगित करण्याचा निर्णय संयुक्त संघर्ष समितीने घेतला आहे. या संयुक्त बैठकीमध्ये कोळसा खाण भविष्य निर्वाह निधीचे ईपीएफमध्ये विलिनीकरण न करता पूर्वीप्रमाणे ही योजना सुरू राहील, असे ठरविण्यात आले. कोळसा खाण भविष्य निर्वाह निधी योजनेत निवृत्ती योजनेअंतर्गत होणारी वेतन कपात खाण व्यवस्थापन व कामगार यांच्यामध्ये सारख्या प्रमाणात करण्यात येणार आहे. वेतन समझोता-९ मधील अपुर्ण मागण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आला. या मागण्या ३० जून २०१६ पासून प्रलंबित होत्या. ओवरटाईम भत्ता, सिलिंग या संदर्भातील व्यवस्थापनाने य्मागण्या मान्य केल्या. कोळसा खाणी आत्ताच बंद करण्यात येणार नाही. संचालन समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. असेही बैठकीत ठरविण्यात आल्याचे भामसचे वर्धा रॅली, चंद्रपूर, बल्लारपूर विभागाचे प्रचारप्रमुख प्रशांत कोकुला यांनी कळविले आहे.
कोळसा खाण कामगारांचा संप स्थगित
By admin | Updated: June 19, 2017 00:47 IST