शाळेपासून दूर गेलेला तरुण मोठ्या पदावर : संघर्षातून मिळविले यश
नीलेश झाडे
गोंडपिपरी : घरच्या हलाकीच्या परिस्थितीमुळे तो शाळेपासून तब्बल पाच वर्षे दूर राहिला. कोवळ्या वयात त्याने शेतात नांगर चालविले. पण शिकल्याशिवाय मन स्वस्थ बसेना. म्हणून त्याने पुन्हा शाळेत पाय ठेवला. प्रामाणिक प्रयत्नाने त्याने गरुडझेप घेतली. स्पर्धा परीक्षेत यश मिळवत तो समाजकल्याणचा निरीक्षक झाला. नुकत्याच झालेल्या एमपीएससीच्या सहायक प्रशासकीय अधिकारी पदाचा निकाल लागला. त्यात त्याने बाजी मारली. अल्पशा अपयशाने खचून जाणाऱ्या तरुणांना प्रेरणादायी ठरणारे यश त्याने संपादित केले आहे.
प्रशांत खर्डीवार असे या तरुणाचे नाव असून, तो गोंडपिपरीचा भूमिपुत्र आहे. गोंडपिपरीच्या प्रशांत खर्डीवार या तरुणाने आठवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर परिस्थितीमुळे त्याला शाळा सोडावी लागली. आपल्या मुळगावच्या शेतीचा भार त्याने खांद्यावर घेतला. एवढ्या कमी वयात त्याने असा निर्णय का घेतला, या विचाराने कुटुंबीयांत चिंता पसरली. शेतात प्रचंड मेहनत घेत प्रशांतने अनेक वर्षे यशस्वीपणे भार पेलला. काही वर्षांनी त्याच्यात शिक्षणाविषयी गोडी निर्माण झाली. सतरांनंबरचा फार्म भरून त्याने दहावीची परीक्षा दिली, पण पहिल्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. मराठी, इंग्रजी, हिंदी या तीनही भाषेच्या विषयात तो नापास झाला. पण त्याने हार मानली नाही. पुन्हा दुसऱ्या वर्षी अर्ज भरला. यावेळी त्याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. अकरावीत नियमितपणे प्रवेश घेतला. बारावीत महाविद्यालयातून पहिला येत त्याने कमाल केली. शिक्षक होण्याच स्वप्न बघत प्रशांतने डी.एडचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, जि. प. शिक्षकांची पदभरती होत नव्हती. अनेक वर्षे भरतीची वाट पाहून कंटाळलेल्या प्रशांतने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे ठरविले. गावात राहून परीक्षेची तयारी पाहिजे त्या पद्धतीने होऊ शकत नाही, हे बघून त्याने पुणे गाठले. या काळात किशोर सुलाने यांनी त्याला मोठी मदत केली. अभ्यासाने झपाटलेल्या प्रशांतला सातत्याने केलेल्या प्रयत्नाचे फळ मिळाले अन् तो समाजकल्याण निरीक्षक झाला.
सध्या तो पुणे जिल्ह्यात कार्यरत आहे. परवा तब्बल तीन वर्षांनंतर एमपीएससीच्या सहायक प्रशासकीय अधिकारी पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल लागला अन् प्रशांतने त्यातही बाजी मारत आपले अस्तित्व सिद्ध केले. तो लवकरच त्या पदावर रुजू होणार आहे. शिक्षणापासून कोसोदूर जात शेतात राबणाऱ्या प्रशांतने संघर्षाने केलेली कमाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
180721\img-20210717-wa0014.jpg
प्रशांत खर्डीवार