कसा सुधारणार शैक्षणिक दर्जा? : १३ हजार विद्यार्थ्यापैकी केवळ ७७१ विद्यार्थ्यांची निवडमंगेश भांडेकर चंद्रपूरलहान मुलांना शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक हातभार लागावे, यासाठी राज्य शासनामार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. मात्र जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेचा आलेख बघितल्यास अत्यंत बिकट अशी स्थिती दिसते. २०१४-१५ या वर्षात इयत्ता चौथी व सातवीच्या सर्व व्यवस्थापनामधील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत केवळ पाच टक्के विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामुळे उत्तीर्ण होऊनही अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागल्याची माहिती समोर आली आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात इयत्ता चौथी व सातवीच्या सर्व व्यवस्थापनामधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला जिल्ह्यातून तब्बल २३ हजार ६४३ विद्यार्थी बसले होते. यात चौथीचे १२ हजार ४९२ तर सातवीचे ११ हजार १५१ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी १३ हजार ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ५६.७५ एवढी आहे. मात्र एवढे विद्यार्थी उत्तीर्ण होऊनही केवळ ७७१ विद्यार्थीच शिष्यवृत्तीस पात्र ठरले. पूर्व प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी घेण्यात येत असलेल्या या शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या चवथीच्या विद्यार्थ्यांला तीन वर्षापर्यंत ५०० रूपये प्रती महिना व सातवीच्या विद्यार्थ्यास तीन वर्षांपर्यंत ७५० रूपये प्रतिमहिना शिष्यवृत्ती दिली जाते.या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य खरेदी व इतर कामात आर्थिक मदत मिळते. मात्र जिल्ह्याच्या कोट्यानुसार विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरत असल्याने अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होवूनही या शिष्यवृत्तीला मुकावे लागत असल्याची स्थिती आहे.
शिष्यवृत्ती पात्रतेत जिल्ह्याचे विद्यार्थी बाद
By admin | Updated: December 30, 2015 01:39 IST