वसंत खेडेकर बल्लारपूर चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या शाळांच्या लाकडी फाटे व कवेलूंचे छप्पर यांनी बनलेल्या इमारती त्या काळी ‘शाळा इमारत मॉडेल’ असे मानल्या जात होत्या. बहुतेक शाळा इमारतींची बांधणी सारखीच ! इंग्रजी यू किंवा चौकोनी हौदाच्या आकाराची ! काळ बदलला शाळांच्या इमारतींचे मॉडेल बदलून त्याची जागा आता स्लॅबच्या इमारतींनी घेतली आहे. मात्र, जुन्या लोकांच्या मनात ‘त्या ’ इमारती घर करुन बसल्या आहेत. तसल्या इमारती आजही कायम आहेत. मात्र, त्यांची संख्या दुर्मिळ ! अपवादात्मक संख्येत त्या दिसून येतात. या दुर्मिळ होत असलेल्या इमारतीची आपली खास ठेवण होती. गावाबाहेरची खुली आणि रस्त्याला लागून असलेली प्रशस्त जागा. त्या जागेवर ही इमारत उभी ! स्लॅबच्या आताच्या दोन मजली एवढी इमारतीची उंची. दर्शनी भागात पाच सहा खोल्या. त्यांच्या दोन्ही बाजूला एकमेकांसमोर पाच सहा खोल्या. मुख्य इमारतीला लागून छप्पर आणि समोर पटांगण ! प्रत्येक खोलीला दारासोबतच मागे पुढे अशा निदान चार खिडक्या, जेणेकरून खोल्यांमध्ये हवा खेळती राहील आणि मुख्याध्यापकाला आपल्या कक्षात बघून वर्ग खोलीत काय चालले आहे, हे बघता येईल ! मैदानात मधोमध ध्वजारोहणाचा चबुतरा आणि शाळेभोवती संरक्षक भिंत असेल तर दर्शनी भागात प्रवेशद्वार, त्यावर कमान आणि त्या कमानीवर विद्यालयाचे नाव ! शाळा शासकीय वा खासगी प्राथमिक असो वा माध्यमिक कोणत्याही शाळेच्या इमारतीचा सारखा साचा ठरलेलाच, तशा इमारती आता नावापुरत्याच उरल्या आहेत. आता, बहुतके शाळा आपापल्या पद्धतीने शाळा इमारती बांधत असल्याचे दिसून येते. जुन्या पद्धतीच्या शाळा इमारती आता फारशा नजरेत पडत नाही. चंद्रपूर- नागपूर मार्गावर नंदोरी या गावात गावाच्या काही अंतरावर मुख्य मार्गाच्या जवळ त्या प्रकारची जुनी कवेलूची इमारत तेवढी बघायला मिळते. ती इमारत बघून जुन्या लोकांना आठवण येते त्यांनी शिक्षण घेतलेल्या आपल्या शाळा इमारतीची, आपल्या गावाची.
शाळांच्या कवेलू मॉडेल इमारती आता दुर्मिळ
By admin | Updated: December 26, 2016 01:20 IST