प्राधान्य गटातील सर्वच नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने केले आहे. ५० हजार लसी मिळाल्या तरी एकाच दिवशी लसीकरण पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. मात्र, लस
पुरवठ्याच्या गोंधळात उद्दिष्टपूर्ती करणे शक्य नाही. त्यामुळे उपलब्ध लसीनुसार दररोज ५० ते ७५ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. पुरेसा लससाठा उपलब्ध होत नसल्याने चंद्रपूर महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू ठेवणे अशक्य झाले आहे. शनिवारी पुरेसे डोस मिळाल्याने सर्वच केंद्रांवर लसीकरण झाले. एकाच दिवशी तब्बल ५ हजार ५२८ नागरिकांनी लस घेतली. त्यामुळे आतापर्यंत लस घेणाऱ्यांची संख्या ५ लाख ९३ हजार ६८ पर्यंत पोहोचली आहे. कोरोनाविरुद्ध लढण्याची सकारात्मक मानसिकता नागरिकांना निश्चितपणे बळ देईल, असा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी काढला आहे. लस घेतल्याने हिंमत वाढल्याची कबुली नागरिकही देत आहेत.